भडगाव प्रतिनिधी : –
भडगाव तालुक्यातील खेडगाव व वसंतवाडी येथे विश्व मानव रूहानी केंद्र, नवानगर (हरियाणा) यांच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांसाठी शालेय शिक्षण साहित्य वाटपाचा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. दि. ९ जानेवारी २०२६ रोजी जिल्हा परिषद मराठी शाळा, खेडगाव (ता. भडगाव, जि. जळगाव) येथे झालेल्या कार्यक्रमात अनेक गरजू विद्यार्थ्यांना दप्तर, वही, पेन, पेन्सिल आदी शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले.
विश्व मानव रूहानी केंद्र हे गोरगरीब, वंचित व गरजू घटकांसाठी सातत्याने विविध जनहितकारी योजना राबवित असून शिक्षण, आरोग्य व सामाजिक मदत या क्षेत्रात संस्थेचे उल्लेखनीय कार्य सुरू आहे. कोरोना महामारीच्या कठीण काळातही या संस्थेच्या माध्यमातून अनेक गरजू कुटुंबांना किराणा किटचे वाटप करण्यात आले होते. तसेच रुग्णांसाठी व्हेंटिलेटर बेड, औषधे व आरोग्यविषयक साहित्य उपलब्ध करून देत मानवतेचे कार्य करण्यात आले होते.
याच सामाजिक बांधिलकीतून सध्या ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागू नये, या उद्देशाने शालेय शिक्षण साहित्य वाटपाचा उपक्रम राबविण्यात येत आहे. आज एकाच दिवशी भडगाव तालुक्यातील खेडगाव व वसंतवाडी या दोन ठिकाणी विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले, ही बाब विशेष उल्लेखनीय ठरली आहे.
या उपक्रमाबद्दल खेडगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक तसेच वसंतवाडी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक यांनी विश्व मानव रूहानी केंद्राचे प्रमुख बलजीत सिंहजी महाराज साहेब व संस्थेच्या सर्व सेवेदारांचे मनापासून आभार मानले. अशा सामाजिक उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी नवी उमेद व प्रेरणा मिळत असल्याचे त्यांनी आपल्या मनोगतात सांगितले.
या सेवाकार्यात खेडगाव मानव केंद्राचे फर्स्ट मेंबर नानाभाऊ मिस्त्री, वसंतवाडी येथील फर्स्ट मेंबर प्रकाश राठोड, तसेच चाळीसगाव येथील अनुभवी सेवेदार अशोक आप्पा चौधरी, विजुभाऊ पाटील, रमेश मामा, रवीभाऊ चौधरी यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाच्या शेवटी गावाच्या वतीने उपस्थित नागरिक, पालक व शिक्षकांनी विश्व मानव रूहानी केंद्राच्या सेवाकार्याचे कौतुक करत सेवेदारांचे आभार व्यक्त केले. अशा उपक्रमांमुळे समाजात शिक्षणाबद्दल सकारात्मक वातावरण निर्माण होत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.




Recent Comments