महाराष्ट्रात डिसेंबरच्या सुरुवातीपासून थंडीची चाहूल लागली असून, पुढील २४ तासांत राज्यात कोरडे आणि थंड वातावरण कायम राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने (IMD) व्यक्त केला आहे. उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा प्रभाव वाढल्याने तापमानात घसरण होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी सकाळ-संध्याकाळ उबदार कपड्यांचा वापर करावा, असे आवाहन हवामान खात्याने केले आहे.
कोकणात कोरडे वातावरण; मुंबईला भरतीचा इशारा
रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये कोरड्या हवामानाचा अंदाज आहे.
मुंबईत ४ ते ७ डिसेंबरदरम्यान समुद्राला मोठी भरती येणार असल्याचा इशारा बृहन्मुंबई महापालिकेने दिला असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मध्य महाराष्ट्रात तापमान स्थिर; पुण्यात किंचित वाढ
धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यांत कोरडं आणि थंड हवामान राहील.
पुण्यात किमान तापमानात सुमारे १ अंश सेल्सिअसने वाढ नोंदवली जाईल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
मराठवाड्यात गारठा कायम
छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर व धाराशिव या जिल्ह्यांत कोरडे वातावरण राहणार असून काही भागांमध्ये गारठा कायम राहील, अशी माहिती IMD ने दिली.
विदर्भात स्थिर तापमान; अमरावतीत १३°C
विदर्भात तापमानात मोठा चढ-उतार होणार नाही. अमरावतीसह काही भागांत किमान तापमान १३ अंश सेल्सिअस राहील, असा अंदाज आहे.
