पाचोरा प्रतिनिधी :-
जळगाव येथे आदिलशाह फारुकी संस्था आयोजित माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री तसेच सरोजिनी नायडू राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा भव्यदिव्य उत्साहात संपन्न झाला. विविध सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा या सोहळ्यात सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमात नगरदेवळा, ता. पाचोरा येथील एस. के. पवार हायस्कूलचे आदर्श शिक्षक सैय्यद जाकीर अली लियाकत अली यांना राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये मूल्याधिष्ठित शिक्षण, सामाजिक बांधिलकी, तसेच शालेय उपक्रमांत नेतृत्वाची नवी दृष्टी निर्माण केल्याबद्दल त्यांच्या कार्याची प्रशंसा करण्यात आली.
पुरस्कार स्वीकारताना सैय्यद जाकीर अली यांनी सांगितले,
> “विद्यार्थ्यांची सर्वांगीण प्रगती हीच माझी खरी संपत्ती आहे. सामाजिक योगदानासह शिक्षणाची गुणवत्ता उंचावण्याचे कार्य पुढेही अखंडपणे सुरू राहील.”
पुरस्कार जिंकल्याच्या आनंदात शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, विद्यार्थी, पालक तसेच नगरदेवळा ग्रामस्थांनी त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन केले. गावातील समाजसेवक जिब्बू दादा यांनीही विशेष सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
या पुरस्कारामुळे नगरदेवळा व पाचोरा तालुक्याचा मान उंचावल्याची भावना स्थानिक पातळीवर व्यक्त होत आहे.
