भडगाव पोलिसांचे उत्कृष्ट यश तीन अल्पवयीन मुलींची राजस्थानमधून सुखरूप सुटका.!!!
तिन्ही संशयित अटकेत; पोलिसांच्या तातडीच्या आणि तांत्रिक तपासामुळे प्रकरणाचा जलद उलगडा
भडगाव प्रतिनिधी :-
भडगाव पोलिसांनी अत्यंत तत्परता आणि काटेकोर तपास कौशल्य दाखवत एका गंभीर प्रकरणाचा अवघ्या काही दिवसांत यशस्वी उलगडा केला आहे. भडगाव पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावातून बेपत्ता झालेल्या तीन अल्पवयीन मुलींची राजस्थान राज्यातील अलवर जिल्ह्यातून सुखरूप सुटका करण्यात आली असून, या प्रकरणात तिन्ही संशयित तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
दि. २० ऑक्टोबर २०२५ रोजी भडगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका गावातून तीन अल्पवयीन मुली अचानक बेपत्ता झाल्या. कुटुंबीयांनी व गावकऱ्यांनी परिसरात मोठा शोध घेतला, मात्र कोणताही ठावठिकाणा लागला नाही. त्यानंतर फिर्यादीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
या घटनेच्या अनुषंगाने भडगाव पोलिसांनी गुन्हा क्रमांक ३८०/२०२५ आणि ३८१/२०२५ असे दोन स्वतंत्र गुन्हे भारतीय न्यायसंहितेच्या कलम १३७(२) अंतर्गत नोंदवले. एकाच गावातील आणि एकाच कुटुंबातील तीन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याने परिसरात संभ्रम आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
विशेष पथकांची निर्मिती आणि तपासाची दिशा
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दोन विशेष तपास पथके तयार करण्याचे आदेश दिले. अप्पर पोलीस अधीक्षक नेरकर मॅडम (चाळीसगाव विभाग) आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विजयकुमार ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला.
CCTV फुटेजने मिळाला महत्त्वाचा धागा
तपासादरम्यान पोलिसांनी बेपत्ता मुलींच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांची चौकशी केली. तपासात समजले की तीन तरुण मुलगे देखील बेपत्ता आहेत आणि सर्वांचे मोबाईल फोन बंद आहेत. या परिस्थितीत तपास अधिक गुंतागुंतीचा झाला.
दरम्यान, पोलिसांनी तांत्रिक साधनांचा वापर करून जळगाव रेल्वे स्टेशनवरील CCTV फुटेज तपासले असता, २० ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री ९:२२ वाजता बेपत्ता मुली आणि संशयित तरुण रेल्वे स्टेशनवरील तिकीट घराजवळ दिसल्याचे आढळले. त्या वेळेस झेलम एक्सप्रेस ही रेल्वे स्टेशनवरून सुटत असल्याचे समजले, आणि याच दिशेने तपासाची पुढील दिशा ठरली.
राजस्थानपर्यंतचा पाठलाग आणि यशस्वी कारवाई.या माहितीच्या आधारे पोलिसांनी मुलींच्या व संशयित तरुणांच्या मोबाईल क्रमांकांचा मागोवा घेतला. तांत्रिक माहितीच्या आधारे तपास पथकांना कळाले की संबंधित सर्वजण राजस्थान राज्यातील अलवर जिल्ह्यात आहेत. तात्काळ पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकून तिन्ही संशयित तरुण —
1. रोशन उर्फ श्रावण धनगर मालचे,
2. अजय सुकलाल देवडे,
3. अमोल इश्वर सोनवणे
— यांना ताब्यात घेतले आणि तीनही अल्पवयीन मुलींची सुखरूप सुटका करण्यात यश मिळवले.
या संपूर्ण तपास मोहिमेचे यश खालील अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली मिळाले —
पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी,
अप्पर पोलीस अधीक्षक नेरकर मॅडम (चाळीसगाव विभाग), उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकुरवाड,
तसेच प्रत्यक्ष तपासात खालील अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला :
पोलीस निरीक्षक महेश शर्मा,
पोलीस उपनिरीक्षक सुशिल सोनवणे,
पो.हे.काँ. पांडुरंग पाटील,
पो.ना. मनोहर पाटील,
पोकाँ. महेंद्र चव्हाण,
पोकाँ. प्रविण परदेशी,
पोकाँ. मिलींद जाधव,
म.पो.काँ. सोनि सपकाळे,
आदींनी तपासात उल्लेखनीय कामगिरी बजावली.
पालकांना पोलिसांचे आवाहन या घटनेनंतर जळगाव पोलिसांनी नागरिकांना विशेष आवाहन केले आहे की —
पालकांनी आपल्या मुला-मुलींच्या वर्तणुकीतील बदल, मोबाईल वापर, आणि संगतीवर लक्ष ठेवावे. कोणतीही संशयास्पद हालचाल किंवा संपर्क आढळल्यास त्वरित पोलिसांना माहिती द्यावी. अशा सतर्कतेमुळे अशा घटनांना आळा बसू शकतो.या प्रकरणाच्या जलद उकल आणि अल्पवयीन मुलींच्या सुरक्षित परताव्यामुळे भडगाव पोलिसांबद्दल नागरिकांमध्ये मोठा आनंद आणि समाधान व्यक्त केला जात आहे. पोलिसांच्या तातडीच्या, समन्वयित आणि तांत्रिक तपासामुळे हा गुन्हा उघडकीस आला असून, भडगाव पोलिसांचे हे कार्य कौतुकास्पद आणि प्रेरणादायी ठरले आहे.
