पिंपरखेड येथे पाण्यात बुडून तरुणाचा मृत्यू.!!!
भडगाव प्रतिनिधी :-
भडगाव तालुक्यातील पिंपरखेड गावात घडलेल्या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. गावातील वाल्मीक संजय हयाळींगे (वय २७) हा तरुण पाण्यात बुडाल्याने मृत झाल्याची घटना दि. १४ रोजी सकाळी सुमारास ७ वाजता उघडकीस आली.
मिळालेल्या माहितीनुसार, गावाजवळील नदीकाठी काही नागरिकांना पाण्यात एक मृतदेह आढळून आला. त्यानंतर गावाचे पोलीस पाटील भाईदास महाजन यांनी तत्काळ भडगाव पोलिसांना याबाबत कळविले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. प्राथमिक तपासात हा अकस्मात मृत्यू असल्याचे निदर्शनास आले असून, भडगाव पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान, मृतदेह भडगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला असता, तेथील डॉक्टरांनी वाल्मीक हयाळींगेला मृत घोषित केले. पुढील तपासासाठी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
या घटनेने पिंपरखेड गावात शोककळा पसरली असून, तरुणाच्या अकस्मात निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेचा पुढील तपास पोहेकाे. ज्ञानेश्वर पाटील हे करीत आहेत.
