“शब्दपालवी” दीपावली अंक प्रकाशन आणि २१वे कवी संमेलन — मराठी साहित्याचा अविस्मरणीय सोहळा
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : मराठी साहित्य व कला सेवा आणि शोध आनंदाचा फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २१वे कवी संमेलन आणि “शब्दपालवी” या दीपावली अंकाचा प्रकाशन सोहळा रविवार, दिनांक ९ नोव्हेंबर २०२५ रोजी दिमाखात पार पडला. हा कार्यक्रम मुंबई येथील राजा शिवाजी विद्यालयात संपन्न झाला. “शब्दपालवी” या दीपावली विशेषांकाच्या प्रकाशन सोहळ्यासाठी ज्येष्ठ पत्रलेखक आणि पत्रकार राजन देसाई यांनी अध्यक्षस्थान भूषविले, तर साहित्यिक पत्रकार अनुज केसरकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. “शब्दपालवी” चे संपादक सुभाष कासार आणि त्यांच्या सौभाग्यवती रंजना कासार, वारकरी प्रकाशनचे राहुल मुंढे, सहसंपादिका आश्विनी सोपान म्हात्रे, शोध आनंदाचा फाऊंडेशनचे अध्यक्ष नितीन सुखदरे, सचिव सनी आडेकर आणि मराठी साहित्य व कला सेवाचे संस्थापक अध्यक्ष गुरुदत्त वाकदेकर उपस्थित होते. राजन देसाई यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला साहित्यिक प्रतिष्ठा लाभली आणि सृजनशीलतेचा भावस्पर्शी माहोल निर्माण झाला.
मासिक कवीसंमेलनात कवींनी “तुळशी विवाह”, “सैनिकहो तुमच्यासाठी” आणि “श्रद्धा सबुरी” या विषयांवरील हृदयस्पर्शी कविता सादर केल्या. काव्यरचना, भावपूर्ण अभिवाचन आणि ओघवत्या सादरीकरणामुळे सभागृहात साहित्यिक वातावरण फुलले. कवीसंमेलनात प्रामुख्याने अशोक सहदेव सुकाळे, कल्पना दिलीप मापूसकर, किशोरी शंकर पाटील, कृपा राकेश म्हात्रे, चंद्रकांत दढेकर (अभिवाचन), नमिता नितीन आफळे (अभिवाचन), महेश वैजापूरकर, वनिता साळुंखे, विक्रांत मारूती लाळे, वैभवी विनीत गावडे, शैलजा पुरोहित, स्मिता शाम तोरसकर, जान्हवी शिराळकर आणि गुरुदत्त वाकदेकर या सर्व कवींनी आपल्या काव्यसादरीकरणातून मराठी कवितेची गहनता आणि विविधतेची सुंदर झळाळी प्रकट केली. त्यांच्या प्रभावी सादरीकरणाने उपस्थित रसिकांच्या मनात देशभक्ती, श्रद्धा आणि अध्यात्मिकतेचे सूर जागवले.
या संमेलनाचे आस्वादक म्हणून मिना महेश वैजापूरकर, किरण जाधव आणि राकेश म्हात्रे उपस्थित होते. कवयित्री जान्हवी शिराळकर यांनी सर्व उपस्थित साहित्यप्रेमींना त्यांचा “दुमडलेले कोपरे” हा काव्यसंग्रह सप्रेम भेट देऊन काव्यप्रेमाचा सुंदर आदर्श निर्माण केला. कार्यक्रमाच्या निमित्ताने शोध आनंदाचा फाऊंडेशनचे सचिव सनी आडेकर तसेच जान्हवी शिराळकर, नमिता आफळे, वनिता साळुंखे आणि वैभवी गावडे यांनी सर्व उपस्थितांना स्वादिष्ट खाऊ वाटप करून स्नेहभाव जपला. कार्यक्रमाचे उत्कृष्ट छायाचित्रण किरण जाधव आणि विक्रांत लाळे यांनी कौशल्यपूर्णपणे केले, तर प्रभावी सूत्रसंचालन गुरुदत्त वाकदेकर यांनी करून कार्यक्रमाला ओघवता प्रवाह दिला. त्यांच्या सुसंवादी सूत्रधारणेने संमेलन अधिक रंगतदार आणि आकर्षक बनले.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी नितीन सुखदरे, सनी आडेकर, विक्रांत लाळे, वैभवी गावडे, अनुज केसरकर, किरण जाधव आणि गुरुदत्त वाकदेकर यांनी परिश्रमपूर्वक कार्य केले. त्यांच्या नियोजनबद्ध आणि समन्वयपूर्ण प्रयत्नांमुळे हा साहित्यिक सोहळा संस्मरणीय ठरला. या कवीसंमेलनाने आणि दीपावली अंक प्रकाशन सोहळ्याने मराठी साहित्य, कविता आणि कथासंवेदनांचा एकत्रित उत्सव साजरा केला. भावनांनी ओथंबलेल्या शब्दांच्या या महोत्सवाने नव्या पिढीसमोर मराठी काव्यसंस्कृतीचा दीप उजळवला. खऱ्या अर्थाने “शब्दपालवी” या दीपावली अंकाने मराठी साहित्याला नव्या उमेद, नव्या विचारांची आणि सर्जनशीलतेची पालवी दिली. या कार्यक्रमाने मराठी भाषेचा, कलेचा आणि साहित्यातील अभिव्यक्तीशक्तीचा सुंदर संगम साधत सांस्कृतिक परंपरेला नवी झळाळी दिली.
कार्यक्रमाच्या समारोपावेळी आयोजकांनी जाहीर केले की २२वे कवीसंमेलन येत्या १४ डिसेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात येणार आहे. त्याचे स्वतंत्र निवेदन लवकरच प्रसिद्ध केले जाईल. इच्छुक कवी, साहित्यिक आणि रसिकांनी ही सुवर्णसंधी नक्की साधावी, असे आवाहन आयोजकांनी यावेळी केले. उपस्थित साहित्यप्रेमींनी “शब्दपालवी” या दीपावली अंकाच्या प्रती विकत घेऊन मराठी साहित्यप्रेमाचा नवा आदर्श इतरांपुढे पुढे निर्माण केला.