कासोदा पोलीस स्टेशनतर्फे पोलीस भरतीपूर्व सराव लेखी परीक्षेचे यशस्वी आयोजन.!!!
125 तरुण-तरुणींचा उत्स्फूर्त सहभाग
कासोदा प्रतिनिधी :-
जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या संकल्पनेतून रविवार, दि. 11 जानेवारी 2026 रोजी कासोदा पोलीस स्टेशन व पोलीस पाटील संघटना, कासोदा यांच्या संयुक्त विद्यमाने कासोदा पोलीस स्टेशन हद्दीतील पोलीस भरतीसाठी प्रयत्न करणाऱ्या तरुण-तरुणींसाठी पोलीस भरतीपूर्व सराव लेखी परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.
सदर उपक्रमास कासोदा परिसरातून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला असून एकूण 125 परीक्षार्थींनी या सराव परीक्षेत सहभाग नोंदवला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पोलीस भरती प्रक्रियेची ओळख होावी, लेखी परीक्षेचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा तसेच त्यांच्या तयारीचा आढावा घेता यावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
कासोदा पोलीस स्टेशनतर्फे परीक्षार्थींना काळा पेन, प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका देण्यात आल्या. परीक्षा पूर्णपणे शिस्तबद्ध वातावरणात पार पडली. परीक्षा संपल्यानंतर सर्व परीक्षार्थींंसाठी अल्पोपहाराचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामुळे परीक्षार्थींमध्ये समाधानाचे वातावरण दिसून आले.
या उपक्रमाबाबत परीक्षार्थींनी पोलीस प्रशासनाचे मनःपूर्वक आभार मानले असून, अशा प्रकारचे उपक्रम भविष्यातही सातत्याने राबविण्यात यावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. ग्रामीण भागातील तरुणांसाठी हा उपक्रम मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरत असल्याचे मत अनेक परीक्षार्थींनी व्यक्त केले.
हा पोलीस भरतीपूर्व सराव लेखी परीक्षा उपक्रम मा. पोलीस अधीक्षक, जळगाव श्री. महेश्वर रेड्डी साहेब, मा. अपर पोलीस अधीक्षक, चाळीसगाव परिमंडळ श्रीमती कविता नेरकर मॅडम तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, चाळीसगाव विभाग श्री. विजयकुमार ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
सदर उपक्रमाचे यशस्वी नियोजन व अंमलबजावणी कासोदा पोलीस स्टेशनचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. पोलीस कर्मचारी, पोलीस पाटील संघटना व स्थानिक नागरिकांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम यशस्वी ठरला.




Recent Comments