जिल्हा प्रतिनिधी :- अलिराजा खान
नगरदेवळे ता. पाचोरा येथील सरदार एस. के. पवार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात दि. १० जानेवारी रोजी पोलीस स्थापना दिन सप्ताह तसेच आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने पोलीस व पत्रकार बांधवांचा गौरव व सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्राम शिक्षण समितीचे मानद चिटणीस बापूसाहेब शिवनारायण जाधव होते. प्रमुख पाहुणे म्हणून ग्राम शिक्षण समितीचे संचालक दादासाहेब किशोर पाटील, आप्पासाहेब जगन्नाथ पाटील, तात्यासाहेब वामन पाटील, दादासाहेब अब्दुल गनी शेठ आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती देवीच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार प्रकाशदादा जगताप, सहायक पोलीस उपनिरीक्षक निवृत्ती मोरे, तसेच संजय सोनार, शैलेंद्र बिरारी, सोनू परदेशी, अली रजा खान, फारुख शेख, अतुल भावसार, सौरव तोष्णीवल, जावेद शहा या पत्रकार व पोलीस बांधवांचा सत्कार करण्यात आला.
मार्गदर्शन करताना सहायक पोलीस उपनिरीक्षक निवृत्ती दादा मोरे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत शिक्षकांविषयी आदर ठेवण्याचे महत्त्व अधोरेखित केले. ज्ञानेश्वरीतील ओव्यांची उदाहरणे देत जीवन शिस्तबद्ध, मूल्याधिष्ठित व प्रगतिशील कसे घडवावे याबाबत त्यांनी सखोल मार्गदर्शन केले. त्यांच्या अभ्यासपूर्ण व प्रेरणादायी भाषणाने विद्यार्थी मंत्रमुग्ध झाले.
विद्यालयाचे प्राचार्य श्री. किरण काटकर यांनी आपल्या भाषणात पोलीस व पत्रकार यांची समाजातील भूमिका स्पष्ट केली. कायदा व सुव्यवस्था राखणे आणि सत्य व वस्तुनिष्ठ माहिती जनतेपर्यंत पोहोचवणे या माध्यमातून लोकशाही बळकट करण्याचे कार्य हे दोन्ही घटक करीत असल्याचे त्यांनी नमूद केले.
अध्यक्षीय भाषणात बापूसाहेब शिवनारायण जाधव यांनी पत्रकार व पोलीस बांधवांना शुभेच्छा दिल्या. सामाजिक सलोखा, शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यात त्यांचे योगदान मोलाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. जी. यू. पवार यांनी केले तर आभार प्रदर्शन पर्यवेक्षक श्री. डी. पी. राजपूत यांनी केले. कार्यक्रमासाठी विद्यालयातील शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




Recent Comments