भडगाव वंचित बहुजन आघाडीचा तालुका पक्ष प्रवेश मेळावा उत्साहात संपन्न.!!!
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढविण्याचा निर्धार — जिल्हाध्यक्ष ईश्वर पाटील
भडगाव वंचित बहुजन आघाडीचा तालुका पक्ष प्रवेश मेळावा उत्साहात संपन्न.!!!
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढविण्याचा निर्धार — जिल्हाध्यक्ष ईश्वर पाटील
भडगाव प्रतिनिधी :-
भडगाव तालुक्यात वंचित बहुजन आघाडीचा तालुका पक्ष प्रवेश मेळावा उत्साहात व कार्यकर्त्यांच्या मोठ्या उपस्थितीत पार पडला. या मेळाव्याचे अध्यक्षस्थान जिल्हा अध्यक्ष मा. ईश्वर पाटील साहेब यांनी भूषविले, तर कार्यक्रमाचे संचालन जिल्हा महासचिव व भडगाव तालुका निरीक्षक अॅड. रवींद्र भास्कर ब्राम्हणे साहेब यांनी केले.
या मेळाव्यात जिल्हाध्यक्ष ईश्वर पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “वंचित बहुजन आघाडी ही समाजातील उपेक्षित, वंचित आणि बहुजन घटकांच्या हक्कासाठी लढणारी पक्षसंघटना आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आघाडी स्वबळावर लढविणार असून प्रत्येक गावात संघटन वाढविण्याचे कार्य हाती घेतले जाईल.”
ते पुढे म्हणाले की, “आजही अनेक सामाजिक घटक राजकीय सत्तेपासून वंचित आहेत. त्यांच्या आवाजाला बळ देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी ही खरी पर्यायी ताकद म्हणून उभी राहत आहे. सामाजिक न्याय, समानता आणि विकासाच्या विचारांवर आधारित राजकारणाची दिशा आम्ही देणार आहोत.”
कार्यक्रमात जिल्हा महासचिव अॅड. रवींद्र भास्कर ब्राम्हणे यांनी पक्षाच्या धोरणांवर भाष्य करत सांगितले की, “आघाडीचे उद्दिष्ट फक्त राजकारण करणे नसून समाज परिवर्तनासाठी जनतेमध्ये जागरूकता निर्माण करणे हे आहे. तालुक्यातील प्रत्येक कार्यकर्त्याने गावागावात संघटन बांधणीसाठी कार्य करावे.”
या पक्ष प्रवेश मेळाव्यात गोकुळ संसारे, नाना पगारे, सिद्धार्थ पगारे, जगदीश मोरे, योगेश मोरे, प्रल्हाद बाविस्कर, अरुण बाविस्कर आदींनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. नव्याने दाखल झालेल्या कार्यकर्त्यांचे जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.
मेळाव्याला तालुक्यातील विविध विभागांमधील कार्यकर्ते, पदाधिकारी, तसेच नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी वंचित बहुजन आघाडीच्या विचारधारेप्रती निष्ठा ठेवून आगामी निवडणुकांमध्ये पक्ष बळकट करण्याचा संकल्प केला.