अमित बघेल यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात सिंधी समाजाचा संताप पाचोरा येथे उपविभागीय अधिकाऱ्यांकडे निवेदन.!!!
अमित बघेल यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात सिंधी समाजाचा संताप पाचोरा येथे उपविभागीय अधिकाऱ्यांकडे निवेदन.!!!
पाचोरा प्रतिनिधी :-
पाचोरा येथील संपूर्ण सिंधी समाज, पूज्य सिंधी जनरल पंचायत तसेच भारतीय सिंधी सभा – युवा शाखा (महाराष्ट्र प्रदेश) यांच्या वतीने आज उपविभागीय अधिकारी, पाचोरा यांच्याकडे लेखी निवेदन देण्यात आले. या निवेदनाद्वारे जोहर छत्तीसगड पार्टीचे अध्यक्ष अमित बघेल यांनी सिंधी समाजाच्या आराध्य देवतेबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबाबत कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
दिनांक १२ ऑक्टोबर २०२५ रोजी छत्तीसगड राज्यातील रायपूर येथे पत्रकारांशी संवाद साधताना अमित बघेल यांनी सिंधी समाजाचे आराध्य भगवान श्री झुललाल (झुलेलाल) भगवानांविषयी अत्यंत आक्षेपार्ह, मानहानीकारक आणि धार्मिक भावना दुखावणारे वक्तव्य केले असल्याचा आरोप समाज प्रतिनिधींनी केला आहे. हे वक्तव्य समाज माध्यमांवर (Social Media) आणि विविध न्यूज प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाले असून, त्यामुळे सिंधी समाजामध्ये तीव्र संताप पसरल्याचे निवेदनात नमूद केले आहे.
समाज प्रतिनिधींच्या म्हणण्यानुसार, अमित बघेल यांचे हे वक्तव्य सांप्रदायिक तणाव निर्माण करणारे आणि समाजात असंतोष पसरवणारे आहे. धार्मिक श्रद्धांवर थेट प्रहार करून समाजात वैमनस्य निर्माण करण्याचा हेतुपुरस्सर प्रयत्न त्यांनी केला आहे.
या संदर्भात पाचोरा येथील सिंधी समाजाने उपविभागीय अधिकाऱ्यांना लेखी निवेदन देऊन अमित बघेल यांच्या विरोधात तत्काळ कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे. निवेदन सादर करताना सिंधी समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
निवेदनाची प्रत मा. देवेंद्रजी फडणवीस (उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य), मा. विष्णु देव साई (मुख्यमंत्री, छत्तीसगड राज्य) आणि मा. अमितजी शाह (गृह मंत्री, भारत सरकार) यांना देखील पाठविण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
सिंधी समाजाच्या भावनांचा अपमान करणाऱ्या वक्तव्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच देशातील धार्मिक सलोखा अबाधित राहावा, अशी अपेक्षा सिंधी समाजाने या निवेदनाद्वारे व्यक्त केली आहे.
निवेदन देता वेळी अर्जुनदास टाकुरोजा, गोवर्धनदास रिझाणी, गुलाब मिझुमल पंजावणी, लक्ष्मणदास ताराचंद पर्सनाणी, मोटूमल टकणमल नागवाणी, गुलाबचंद गोकुलदास केसवाणी, राम केसवाणी,सनी पंजाबी, आदी समाज बांधव उपस्थित होते