जुनी पेन्शन संघटनेच्या वतीने काळा दिवस साजरा”कर्मचाऱ्यांचा शासनाविरोधात संताप 25 नोव्हेंबरला दिल्ली येथे भव्य आंदोलन.!!!
जुनी पेन्शन संघटनेच्या वतीने काळा दिवस साजरा”कर्मचाऱ्यांचा शासनाविरोधात संताप 25 नोव्हेंबरला दिल्ली येथे भव्य आंदोलन.!!!
भडगाव प्रतिनिधी :-
महाराष्ट्र शासनाने 31 ऑक्टोबर 2005 रोजी जुनी पेन्शन योजना बंद करून नवी अंशदायी पेन्शन योजना लागू केली. या निर्णयाला राज्यातील सर्व स्तरांवरील शासकीय कर्मचाऱ्यांचा प्रखर विरोध असून, त्याचा निषेध म्हणून आज महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या वतीने काळा दिवस साजरा करण्यात आला.
गेल्या दहा वर्षांपासून कर्मचारी जुनी पेन्शन पुनर्स्थापनेसाठी लढा देत असून, शासनाने या न्याय्य मागणीला अद्यापही प्रतिसाद दिलेला नाही. शासनाकडून नेहमी “कात्रजचा घाट” दाखवला जातो, अशी टीका संघटनेचे आरोग्य विभाग राज्यप्रमुख संजय सोनार कळवाडीकर यांनी केली.
सोनार पुढे म्हणाले की, “जुनी पेन्शन ही कर्मचाऱ्यांचा हक्काची मागणी आहे. सेवा काळ संपल्यानंतर कर्मचाऱ्यांना आर्थिक सुरक्षेची हमी देणारी ही योजना शासनाने अन्यायकारकपणे रद्द केली. म्हणूनच दरवर्षी 31 ऑक्टोबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील कर्मचारी काळे फिती बांधून शासनाचा निषेध व्यक्त करतात.”
जुनी पेन्शन पुनर्स्थापनेसाठी देशव्यापी चळवळ म्हणून नॅशनल मुव्हमेंट ऑफ पेन्शन स्कीम (NMOPS) कार्यरत असून, येत्या 25 नोव्हेंबर 2025 रोजी दिल्ली येथे भव्य आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. या आंदोलनाचे नेतृत्व एनएमओपीएस चे राष्ट्रीय अध्यक्ष विजय कुमार बंधू करणार आहेत.
सोनार यांनी सर्व महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांना दिल्ली येथे होणाऱ्या या आंदोलनात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की, “हा लढा केवळ कर्मचाऱ्यांचा नाही, तर त्यांच्या कुटुंबाच्या भविष्याचा लढा आहे. जोपर्यंत जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू होत नाही, तोपर्यंत हा संघर्ष सुरूच राहील.”
या प्रसंगी यशराज निकम, राजरत्न जाधव, राहुल जाधव, अनंत हिरे, गुलाब पवार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सर्वांनी एकमुखाने जुनी पेन्शन योजनेसाठी एकजूट दाखवून घोषणाबाजी केली.
कर्मचाऱ्यांमध्ये या काळा दिवसानिमित्त तीव्र नाराजी व्यक्त झाली असून, शासनाने लवकरात लवकर कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा विचार करावा, अशी मागणी सर्व स्तरांतून होत आहे.
 
						
