भडगाव तालुक्यात तात्काळ मदत द्यावी,शेतकरी सहकारी संघाची मागणी.!!!
भडगाव प्रतिनिधी :-
तालुक्यात २२ ते २९ सप्टेंबर दरम्यान झालेल्या मुसळधार पाऊस व ढगफुटी सदृश्य परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. कपाशी, मका, सोयाबीन, केळी आदी पिके वाहून गेली असून, पशुधनाचे तसेच घरांचेही मोठे नुकसान झाले आहे.
या पार्श्वभूमीवर शेतकरी सहकारी संघाने ओला दुष्काळ जाहीर करून पंचनामे तात्काळ करावेत आणि सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी अशी मागणी केली आहे. यासंदर्भात तहसिलदार शितल सोलाट यांना निवेदन सादर करण्यात आले.
संघाच्या वार्षिक सभेत संचालक मंडळातर्फे ठराव करून शासनाकडे ही मागणी करण्याचे ठरविण्यात आले होते. त्याच ठरावाची प्रत तहसिल प्रशासनाला देऊन सणासुदीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी करण्यात आली.
निवेदन सादर करताना शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष भैय्यासाहेब पाटील, संचालक अमोल पाटील, व्यवस्थापक सुरेश पाटील, लिपिक अनिल पाटील, साहेबराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष अनिल पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख सुधाकर पाटील, समाधान पाटील तसेच शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.