आषाढी एकादशी निमित्त माऊली भक्त परिवाराकडून फराळ व वृक्ष वाटपाचा उपक्रम.!!!
भडगाव प्रतिनिधी :-
माऊली चौक, चाळीसगाव रोड, भडगाव येथे आषाढी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल-रुख्मिणी पूजन व आरती मोठ्या भक्तिभावाने पार पडली. या कार्यक्रमात तहसीलदार शितल सोलाट, मुख्याधिकारी रवींद्र लांडे, पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध मान्यवर व कॉलनीतील रहिवासी सहभागी झाले.
पूजनानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते फराळ व केळी वाटप करण्यात आले. विशेष म्हणजे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी भाविकांसोबत पारंपरिक वारकरी फुगडी खेळत आनंद द्विगुणित केला. उपस्थित भाविकांनी “साक्षात पंढरपूरची यात्रा येथेच अनुभवायला मिळाली” असे समाधान व्यक्त केले.
माऊली फाउंडेशनच्या वतीने संचालिका संगिता जाधव यांनी पर्यावरण संतुलन उपक्रमांतर्गत प्रमुख मान्यवरांना वृक्षारोपणासाठी विविध प्रकारची रोपे भेट दिली. या उपक्रमात शेतकरी संघ संचालिका व माजी नगरसेविका योजना पाटील तसेच माजी नगरसेवक मनोहर चौधरी यांचाही सहभाग होता.
या संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी माऊली चौक भक्त परिवारासह सामाजिक संघटनांनी मोलाचे सहकार्य व परिश्रम घेतले.