कजगाव बाजारपेठ महत्त्वाची, पण पोलीस सेवा अपुरी: नागरिकांत नाराजी.!!!
भडगाव ता प्रतिनिधी : -आमीन पिंजारी
कजगाव येथील पोलीस मदत केंद्रात पोलीस कर्मचारी कायमस्वरूपी हजर नसल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. या केंद्राची अपुरी सेवा परिसरातील कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने मोठा अडथळा ठरत आहे. त्यामुळे नागरिकांनी शासनाकडे तातडीने कारवाईची मागणी केली आहे.
भडगाव तालुक्यातील कजगाव ही प्रमुख व्यापारी बाजारपेठ असून, येथे दररोज मोठ्या प्रमाणावर लोकांची ये-जा होते. त्यामुळे पोलीस मदत केंद्राची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. मात्र, सद्यस्थितीत येथे पोलीस कर्मचारी राहत नसल्याने तात्काळ मदत मिळवणे अवघड झाले आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, आपत्कालीन प्रसंगी मदत पोहोचण्यात दिरंगाई होते. बाजारपेठेत शिस्त राखण्यातही अडचणी येत आहेत. यामुळे कायदा व सुव्यवस्थेवर परिणाम होतो आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून नागरिक या समस्येबाबत तक्रारी करत आहेत, मात्र अद्यापही प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहिलेले नाही. कजगावमधील व्यापारी वर्गही या परिस्थितीमुळे चिंतेत आहे. पोलिसांच्या गैरहजेरीमुळे गुन्हेगारीला खतपाणी मिळू शकते, अशी भीती व्यक्त होत आहे.
नागरिकांची ठाम मागणी आहे की, कजगाव पोलीस मदत केंद्रात कायमस्वरूपी पोलीस कर्मचारी नियुक्त करावेत. यामुळे केवळ तात्काळ सेवा मिळेलच असे नाही, तर कायदा व सुव्यवस्थेवरही नियंत्रण ठेवता येईल.
कजगावसारख्या महत्त्वाच्या बाजारपेठेत पोलीस सेवा सक्षम असणे हे काळाची गरज आहे. शासनाने या दिशेने त्वरित लक्ष देऊन पावले उचलावीत, अशी नागरिकांची मागणी आहे.