गोंडगाव येथे विद्युत तारा तुटल्याने दोन म्हशींचा जागीच मृत्यू.!!!
भडगाव (प्रतिनिधी – आमिन पिंजारी):
कजगाव (ता. भडगाव) येथील गोंडगाव शिवारात १७ जून रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास विद्युत तारा तुटल्याने दोन म्हशींचा जागीच मृत्यू झाला आहे.
गावातील चिलखानजवळील शेतात एक युवक म्हशी चारत असताना कजगाव-वाडे शिवारालगत जाणाऱ्या थ्री-फेज विद्युत वाहिन्यांमध्ये अचानक शॉर्टसर्किट झाला. त्यामुळे विद्युत प्रवाह असलेल्या तारा तुटून शेतात पडल्या आणि त्याखाली दोन म्हशी आल्या. या दुर्दैवी घटनेत म्हशींचा जागीच मृत्यू झाला, तर म्हशी चारणारा युवक बालंबाल बचावला.
या अपघातात नामदेव रामचंद्र पाटील यांच्या अंदाजे ₹८०,००० किमतीची व मुसा शेख यांच्या अंदाजे ₹१,००,००० किमतीची म्हैस ठार झाली आहे. दोन्ही पशुधन मालकांनी व्याजावर पैसे काढून म्हशी विकत घेतल्या होत्या, त्यामुळे त्यांच्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे.
गरिबीच्या परिस्थितीतही मेहनतीने पशुधन उभारलेले शेतकरी अचानक झालेल्या या नुकसानीमुळे हतबल झाले आहेत. त्यामुळे महावितरण कंपनीने किंवा शासनाने आपत्कालीन मदतनिधीतून तातडीची मदत करावी, अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.