भडगाव येथे प्रतिज्ञापत्र (Affidavit) सेवा बंद नागरिकांचे हाल,प्रशासनाकडे त्वरित कारवाईची मागणी.!!!
भडगाव प्रतिनिधी :-
भडगाव तालुक्यातील तहसील कार्यालयाजवळील सेतू सुविधा केंद्रात प्रतिज्ञापत्र (Affidavit) तयार करण्याची सेवा सुरू होती. मात्र, मागील काही दिवसांपासून ही सेवा प्रशासनाच्या आदेशाने बंद करण्यात आली आहे. परिणामी, विविध शासकीय कामांसाठी आवश्यक असलेली प्रतिज्ञापत्रे तयार करण्यासाठी नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
पूर्वी ही सेवा सेतू केंद्रातून नाममात्र शुल्कात (₹50 ते ₹60) उपलब्ध होती. आता मात्र नागरिकांना वकिलामार्फत नोटरी करून घेण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. त्यामुळे त्याच कामासाठी आता ₹300 ते ₹400 खर्च करावा लागत असून, याचा थेट आर्थिक फटका सामान्य व गरीब नागरिकांना बसत आहे.
या पार्श्वभूमीवर भडगाव तालुक्यातील अनेक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. यासंदर्भात कजगाव येथील पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते आमीन पिंजारी यांनी पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोर अप्पा पाटील यांच्याकडे नागरिकांची व्यथा मांडली आहे.
भडगाव तहसीलदारांनी त्वरित लक्ष घालून सेतू सुविधा केंद्रात पुन्हा प्रतिज्ञापत्र सेवा सुरू करावी, अशी जोरदार मागणी होत आहे. ही सेवा पुन्हा सुरू केल्यास नागरिकांना विनाकारण वकिलांकडे वणवण फिरण्याची वेळ येणार नाही आणि त्यांच्या वेळेची व पैशांची बचत होईल.