मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्याचे वितरण सुरू
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दरमहा ₹1500 जमा करण्यात येत असतात. जून महिना उजाडला तरी मे महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाला नव्हता, त्यामुळे लाभार्थ्यांमध्ये प्रतीक्षा होती.
आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली आहे. मे महिन्याचा हप्ता खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे. मंत्री अदिती तटकरे यांनी ट्वीट करून ही माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना: मे महिन्याच्या सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना मे महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार लिंकड् बँक खात्यात उद्यापासून हा सन्मान निधी जमा होणार आहे.”
अदिती तटकरे यांनी पुढे म्हटले की, “महायुती सरकारचा दृढ निश्चय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणि महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा दृढ विश्वास या बळावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची दमदार वाटचाल यापुढेही अशीच सुरू राहणार हा मला विश्वास आहे.”
योजनेचा 11 वा आणि 12वा हप्ता:
लाडक्या बहिणींना राज्य सरकारकडून दरमहा ₹1500 थेट डीबीटी (Direct Benefit Transfer) द्वारे बँक खात्यात जमा केले जातात. आतापर्यंत एकूण 10 हप्ते वितरित करण्यात आले आहेत. आता मे महिन्याचा म्हणजेच 11वा हप्ता तर जून महिन्याचा 12वा हप्ता लाडक्या बहिणींना मिळणार आहे.
बँक खात्यात पैसे आले का? असे तपासा स्टेटस:
एसएमएस (SMS)
पैसे जमा झाल्यास तुम्हाला तुमच्या बँकेकडून एसएमएस येईल.
बँक बॅलन्स चौकशी:
बँकेच्या बॅलन्स चेक क्रमांकावर एसएमएस पाठवून किंवा टोल फ्री क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन तुम्ही तुमच्या बँक खात्यातील रक्कम तपासू शकता.
स्मार्टफोन ॲप्स:
नेट बँकिंग, गुगल पे (Google Pay), फोन पे (PhonePe) वापरत असल्यास बँक बॅलन्स तपासू शकता.
एटीएम (ATM): डेबिट कार्ड असल्यास एटीएममध्ये जाऊन शेवटचे व्यवहार (Last Transaction History) पाहू शकता.
बँकेत भेट:
बँकेत प्रत्यक्ष जाऊन तुम्ही आपल्या बँक खात्यात पैसे जमा झाले आहेत की नाही हे तपासू शकता.