जळगाव जिल्ह्यातील वावडदा गावात आदर्श विवाह : दिराने केली विधवा वहिनीशी विवाहगाठ.!!!

0 914

जळगाव जिल्ह्यातील वावडदा गावात आदर्श विवाह : दिराने केली विधवा वहिनीशी विवाहगाठ.!!!

जळगाव प्रतिनिधी | २४ मे २०२५

वावडदा (ता. जळगाव) येथे नुकत्याच पार पडलेल्या एका आदर्श विवाहामुळे समाजात मानवी मूल्यांचा एक नवा आदर्श उभा राहिला आहे. अकाली पती गमावलेल्या दीपालीच्या जीवनात तिच्या दिराने, अजयने, विवाह करून नव्याने आशेचा किरण आणला. या विवाहामुळे फक्त दीपालीच नव्हे, तर तिच्या लहानग्या मुली सेजललाही वडिलांचे प्रेम मिळाले आहे.

दीपालीचा विवाह मूळ वावडदा येथील विशाल रघुनाथ पाटील याच्याशी झाला होता. शेती आणि दुग्धव्यवसाय करत विशाल आपले कुटुंब सुखाने चालवत होता. त्यांच्या संसारवेलीवर ‘सेजल’ या कन्यारत्नाचे आगमन झाले, परंतु अवघ्या सहा महिन्यांतच विशालचे अचानक निधन झाल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला.

या संकटाच्या काळात विशालचा लहान भाऊ अजय आणि कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांनी पुढाकार घेत, दीपालीशी अजयचा विवाह करण्याचा निर्णय घेतला. सामाजिक रूढींना बाजूला ठेवत, दीपाली व सेजलच्या भवितव्याचा विचार करून दोन्ही कुटुंबांनी याला संमती दिली.

हा विवाह वावडदा येथील भवानी मातेच्या मंदिरात, अत्यंत साध्या आणि मोजक्या नातेवाइकांच्या उपस्थितीत पार पडला. अजयने घेतलेला हा निर्णय समाजासमोर एक प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे.

या निर्णयामागे माजी उपसरपंच रवींद्र चिंतामण पाटील, बिलखेड्याचे पोलिस पाटील मुकुंदा पाटील तसेच शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख रखी कापडणे यांचे मार्गदर्शन लाभले.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!