पावसाळापूर्व स्वच्छता मोहिमेला पाचोरा शहरात सुरुवात – आमदार किशोर पाटील यांच्या आदेशानुसार महत्त्वपूर्ण पाऊल.!!!
पावसाळापूर्व स्वच्छता मोहिमेला पाचोरा शहरात सुरुवात – आमदार किशोर पाटील यांच्या आदेशानुसार महत्त्वपूर्ण पाऊल.!!!
पाचोरा प्रतिनिधी :-
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पावसाळ्यापूर्वी पाचोरा शहरातील गटारी, नाले आणि भुयारी गटारांची सफाई करण्याचे काम पाचोरा नगरपालिकेच्या वतीने हाती घेण्यात आले आहे. यंदा अवकाळी पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून पाचोरा-भडगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. किशोर पाटील यांनी तातडीने स्वच्छता मोहिम सुरू करण्याचे आदेश दिले.
या आदेशाची अंमलबजावणी करत मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी आरोग्य निरीक्षक तुषार नक्वाल यांच्याकडे मोहिमेची जबाबदारी सोपवली. मोहिमेची सुरुवात प्रभाग क्रमांक आठमधून करण्यात आली. यावेळी तालुका माझा न्यूज चे संपादक व जनसेवक बंडूभाऊ केशव सोनार यांच्या प्रमुख उपस्थितीत मोहिमेचा औपचारिक प्रारंभ झाला.
गटारी व नाल्यांमध्ये वर्षभर साचलेला गाळ पावसाळ्यात पाणी साचण्यास आणि पूरपरिस्थिती निर्माण होण्यास कारणीभूत ठरतो. ही स्थिती टाळण्यासाठी नगरपरिषद टप्प्याटप्प्याने संपूर्ण शहरात मोहिम राबवणार आहे. सध्या नगरपालिका कर्मचाऱ्यांद्वारे युद्धपातळीवर स्वच्छता काम सुरू असून, प्रत्येक प्रभागासाठी नियोजन करण्यात आले आहे.
स्वच्छता कामांदरम्यान आरोग्य विभागाचे मुकादम पांडुरंग कोळी आणि भिकन गायकवाड यांनी देखरेख केली. नगरपरिषदेने सर्व नागरिकांना मोहिमेस सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
शहरातील आरोग्य, स्वच्छता आणि नागरी सुविधा सुरळीत ठेवण्यासाठी हे अभियान अत्यंत महत्त्वाचे असून, येत्या पावसाळ्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे नगरपरिषदेने स्पष्ट केले आहे.