पाहूर-पाचोरा महामार्गावर अपघातांची मालिका; सुरक्षेचा अभाव ठरत आहे जीवघेणा.!!!
पाचोरा प्रतिनिधी –
पहूर ते पाचोरा दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १९ चे रुंदीकरणाचे काम मागील महिन्यापासून सुरू असून, हे काम अत्यंत धोकादायक व असुरक्षित पद्धतीने पार पडत आहे. ठेकेदाराकडून सुरक्षाविषयक नियमांची पायमल्ली होत असल्यामुळे अपघातांचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या महिनाभरात सुमारे २० अपघातांची नोंद झाली असून, अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. गुरुवारीदेखील एक गंभीर अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे.
महामार्गावर रस्त्याच्या दुतर्फा ना योग्य ती सूचना फलक आहेत, ना संकेतचिन्हे. रात्रीच्या वेळी अपूर्ण काम, उघडे खड्डे आणि पुरेशा प्रकाशव्यवस्थेचा अभाव यामुळे वाहनचालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.
स्थानिक नागरिकांनी कामात भ्रष्टाचार झाल्याचे आरोप करत संबंधित शासकीय विभागांवर दुर्लक्षाचा ठपका ठेवला आहे. नागरिकांनी कामाची सखोल चौकशी करून तातडीने सुरक्षेच्या नियमांची अंमलबजावणी करण्याची मागणी केली असून, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.