HSRP नंबर प्लेटबाबत महत्त्वाची बातमी, या वाहनधारकांचं फिटमेंट शुल्क होणार माफ.!!!
मुंबई :-
राज्यातील जुन्या वाहनांसाठी उच्च सुरक्षा क्रमांक प्लेट (HSRP) बसवण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी परिवहन आयुक्तालयाने मोठा निर्णय घेतला आहे. जर एखाद्या सोसायटी किंवा इमारतीतील २५ पेक्षा जास्त वाहनधारकांनी एकत्रित नोंदणी केली, तर अधिकृत एजन्सी त्या सोसायटीत जाऊन थेट HSRP बसवणार आहे.
विशेष म्हणजे, अशा प्रकरणांमध्ये वाहनधारकांकडून फिटमेंट शुल्क आकारले जाणार नाही.
३० एप्रिलपर्यंत HSRP बसवणे अनिवार्य
२०१९ पूर्वी नोंदणीकृत वाहनांसाठी HSRP बसवण्याची अंतिम मुदत 30 एप्रिल निश्चित करण्यात आली आहे. यापूर्वी वाहनधारकांना घरपोच सेवा हवी असल्यास त्यासाठी अतिरिक्त शुल्क आकारले जात होते. दुचाकीसाठी 125 रुपये आणि चारचाकीसाठी 250 रुपये असे फिटमेंट शुल्क होते. मात्र, नवीन निर्णयानुसार सोसायटी नोंदणी केल्यास हे शुल्क पूर्णतः माफ होईल.
केंद्रांवरील गर्दी कमी करण्याचा प्रयत्न
परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी सांगितले की, वाहनधारकांना नंबर प्लेटसाठी केंद्रांवर जाण्याचा त्रास कमी व्हावा आणि गर्दी नियंत्रित रहावी यासाठी हा निर्णय घेतला गेला आहे. HSRP साठी निश्चित दर वाहनाच्या प्रकारानुसार ठरवले गेले आहेत – दुचाकीसाठी 531 रुपये, तीनचाकीसाठी 590 रुपये आणि चारचाकी/व्यावसायिक वाहनांसाठी 879 रुपये.
तीन विभागांमध्ये HSRP कार्यान्वित
राज्यातील प्रादेशिक आणि उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांना तीन विभागांमध्ये विभागून, स्वतंत्र एजन्सीच्या माध्यमातून HSRP बसवण्याची प्रक्रिया सुरू आहे. आतापर्यंत १८ लाखांहून अधिक वाहनधारकांनी HSRP घेतली असून, दररोज सरासरी १०,००० नवीन नोंदण्या होत असल्याची माहिती परिवहन विभागाने दिली आहे.
वाहनधारकांसाठी सुवर्णसंधी
HSRP बसवण्यास विलंब केल्यास दंड भरावा लागू शकतो, त्यामुळे वाहनधारकांनी त्वरित नोंदणी करून ही प्रक्रिया पूर्ण करावी. सोसायटीच्या माध्यमातून सामूहिक नोंदणी केल्यास अतिरिक्त खर्च वाचणार असल्याने, हा पर्याय वाहनधारकांसाठी मोठी संधी ठरणार आहे.