पत्रकारांचा अवमान सहन केला जाणार नाही; व्हॉईस ऑफ मीडियाचे भडगाव पोलिसांना निवेदन.!!!
भडगाव प्रतिनिधी :-
शिवसेना (शिंदे गट)चे खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांबाबत केलेल्या कथित अपमानास्पद वक्तव्याच्या निषेधार्थ व्हॉईस ऑफ मीडिया, भडगाव शाखेतर्फे रविवारी भडगाव पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक महेश टाक यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनाद्वारे पत्रकारांविषयी करण्यात आलेल्या अवमानकारक वक्तव्याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून त्यांच्या सन्मानाला धक्का पोहोचविणारी कोणतीही भाषा अथवा वक्तव्य अस्वीकार्य असल्याचे नमूद करत, संबंधित खासदारांवर तातडीने कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी व्हॉईस ऑफ मीडियाचे जळगाव जिल्हाध्यक्ष कल्पेश महाले, जिल्हा संपर्कप्रमुख विठ्ठल मराठे, तालुका अध्यक्ष विलास पाटील, शहर अध्यक्ष संजय शेवाळे, तालुका उपाध्यक्ष पंकज पाटील, शहर उपाध्यक्ष गणेश पाटील, ज्येष्ठ सल्लागार अशोक परदेशी तसेच शहर संघटक गणेश अहिरे उपस्थित होते.
याप्रसंगी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी पत्रकारांचा सन्मान कायम राखला जावा, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर केला जावा आणि पत्रकारांविषयी अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी प्रशासनाकडे केली.





