मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे देशमुख महाविद्यालयात उद्घाटन.!!!
भडगाव प्रतिनिधी :-
पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित सौ. रजनीताई नानासाहेब देशमुख कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवड्या’चे उद्घाटन नुकतेच संपन्न झाले. मराठी विभागाच्या वतीने या पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे. उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ. दीपक मराठे होते. पंधरवड्याचे उद्घाटन प्राचार्य डॉ. एन. एन. गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्राणीशास्त्र विभागप्रमुख डॉ. अविनाश भंगाळे उपस्थित होते.
भाषा जिवंत राहिली तर संस्कृती जिवंत राहील. संस्कृती जिवंत राहिली तर राष्ट्र टिकेल. त्यासाठी भाषा व साहित्याचे संवर्धन होणे फार आवश्यक आहे. विविध आशयाच्या साहित्यातून मानवी जीवनाचे दर्शन घडते. मानवी जीवन सर्वार्थाने समजून घ्यायचे असेल आणि आपले व्यक्तिमत्व सर्वांगाने फुलवायचे असेल तर साहित्याचे वाचन अनिवार्य आहे, अशा प्रकारचे प्रतिपादन मान्यवर वक्त्यांनी बोलताना केले.
मराठी विभागप्रमुख डॉ. अतुल देशमुख यांनी प्रास्ताविकातून मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त आयोजित विविध कार्यक्रम व उपक्रमांमागची भूमिका विशद केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अधिकराव पाटील यांनी केले तर प्रा. ज्योती नन्नवरे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाला डॉ. चित्रा पाटील, डॉ. बी. एस. भालेराव, प्रा. आर. एम. गजभिये, डॉ. सचिन हडोळतीकर, प्रा. शिवाजी पाटील, डॉ. गजानन चौधरी, डॉ. इंदिरा लोखंडे, डॉ.जनार्दन देवरे, प्रा. प्रवीण देसले व विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.