मुंबई :-
राज्यातील वाहनधारकांसाठी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) लावण्याची अंतिम मुदत आता काहीच दिवसांवर येऊन ठेपली आहे. ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत जुन्या वाहनांवर HSRP बसवणे अनिवार्य करण्यात आले असून ही मुदत न पाळणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांकडून कडक कारवाई आणि मोठ्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे.
राज्यातील मोठ्या प्रमाणातील वाहनांवर अजूनही HSRP बसवलेली नसल्याने प्रशासन चिंतेत असून, शेवटच्या क्षणी होणारी गर्दी टाळण्यासाठी तातडीने नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
एप्रिल 2019 पूर्वीची सर्व वाहने अनिवार्यपणे HSRPच्या कक्षेत
केंद्र सरकारच्या आदेशानुसार १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत सर्व वाहनधारकांना HSRP लावणे बंधनकारक आहे. यामध्ये दोनचाकी, चारचाकी, तसेच व्यावसायिक वाहने यांचा समावेश आहे.
सरकारने आधीच तीनवेळा मुदतवाढ दिल्यानंतर आता जाहीर केलेली ३० नोव्हेंबरची तारीख अत्यंत निर्णायक मानली जात आहे.
याआधीच्या मुदतवाढी :
30 एप्रिल 2025
15 ऑगस्ट 2025
30 नोव्हेंबर 2025 (सद्य अंतिम तारीख)
चर्चा अशी असली की मुदत 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढू शकते, परंतु याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.
लाखो वाहनांनी अद्याप अर्जच केलेला नाही
महाराष्ट्रात HSRP प्रक्रियेचा वेग अत्यंत धीमा असल्याचे वाहतूक विभागाने मान्य केले आहे.
राज्यभरात लाखो वाहनधारकांनी अद्याप HSRP साठी नोंदणीच केली नाही
बुक केलेल्या 56 हजार वाहनांवर HSRP बसवण्याचे काम सुरु आहे
तरीही राज्यातील एकूण वाहनांच्या तुलनेत ही संख्या अत्यल्प
यामुळे अंतिम मुदतीजवळ मोठी गर्दी निर्माण होण्याची शक्यता आहे.
HSRP नसेल तर दंड कठोर
HSRP अनिवार्य असून नियम न पाळणाऱ्यांसाठी दंडाची तरतूद खालीलप्रमाणे आहे—
रजिस्ट्रेशन केले, पण प्लेट बसवली नाही → ₹1,000 दंड
रजिस्ट्रेशनच केलेले नाही → थेट ₹10,000 दंड
म्हणजेच, आजच नोंदणी केली तर जवळपास ₹9,000 दंड वाचू शकतो.
याशिवाय, वाहन तपासणी, विमा क्लेम, आरटीओ प्रक्रिया, मालकी बदल यांसारख्या कामांमध्येही अडथळे येऊ शकतात.
HSRP म्हणजे काय? का आवश्यक.?
HSRP म्हणजे उच्च सुरक्षा प्रदान करणारी ॲल्युमिनियम नंबर प्लेट. यात खालील सुरक्षा फीचर्स असतात
अशोक चक्रासह क्रोमियम-आधारित होलोग्राम
लेझर-इन्कोडेड 9-अंकी युनिक आयडी
नॉन-रिमूव्हेबल स्नॅप लॉक
बनावट नंबर प्लेट आणि छेडछाड होऊ नये यासाठी टेंपर-प्रूफ डिझाईन
या तंत्रज्ञानामुळे चोरी झालेली वाहने शोधणे सोपे होते आणि बनावट नंबर प्लेटचा वापर रोखला जातो.
वाहनधारकांनी काय करावे?
शक्य तितक्या लवकर ऑनलाइन किंवा अधिकृत केंद्रावर HSRP साठी बुकिंग करावे
आधीच बुकिंग केले असल्यास फिटमेंटची तारीख चुकवू नये
शेवटच्या क्षणी होणारी गर्दी टाळावी
दंड, वाहन जप्ती किंवा तपासणीतील अडचणींपासून बचावासाठी नियमांनुसार प्लेट बसवावी
HSRP अनिवार्यतेबाबत शासनाने चार वेळा मुदतवाढ दिली असली तरी नागरिकांकडून अजूनही अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. येत्या काही दिवसांत अंतिम तारीख जवळ येत असल्याने प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात तपासणी मोहीमा राबवल्या जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहनधारकांनी वेळ न घालवता तात्काळ HSRP बसवणेच हिताचे आहे.
