भडगाव प्रतिनिधी :-
भडगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 जवळ येत असताना निवडणूक प्रशासन पूर्ण सज्ज झाले आहे. आगामी निवडणूक सुरळीत, पारदर्शक आणि कायदेशीर प्रक्रियेत पार पडावी यासाठी तालुका प्रशासन, निवडणूक शाखा आणि नियुक्त अधिकारी सतत तयारीत आहेत. या पार्श्वभूमीवर नगरपरिषद निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांचे दुसरे प्रशिक्षण सत्र आज तालुका क्रीडा संकुल, पाचोरा रोड, भडगाव येथे संपन्न झाले.
या प्रशिक्षणाला मतदान कर्मचाऱ्यांची उत्स्फूर्त उपस्थिती पाहायला मिळाली. सकाळी अचूक 10 वाजता सुरू झालेल्या या सत्रात निवडणूक प्रक्रिया, नियम, मार्गदर्शक तत्त्वे, मतदान केंद्रांवरील जबाबदाऱ्या आणि EVM हाताळणी यासह विविध बाबींवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
विविध प्रभागात ४३ मतदान केंद्र — ३३० मतदान कर्मचारी सज्ज
भडगाव शहरातील प्रभागनिहाय निवडणूक यंत्रणेची आखणी पूर्ण झाली आहे. संपूर्ण नगरपरिषदेतील 43 मतदान केंद्रे अंतिम करण्यात आली असून या केंद्रांवर एकूण 330 मतदान कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. त्याशिवाय मतदान दिवशी देखरेखीचे काम पार पाडण्यासाठी 6 सेक्टर अधिकारीही नियुक्त झाले आहेत.
या अधिकाऱ्यांची जबाबदारी मतदान केंद्रांची पाहणी करणे, कर्मचार्यांना मदत करणे, तांत्रिक समस्या सोडवणे आणि मतदान प्रक्रिया अखंडित सुरू राहील याची खात्री करणे अशी असणार आहे.
मतदान प्रक्रिया, कागदपत्रे, मार्गदर्शक तत्त्वांवर सखोल प्रशिक्षण
या प्रशिक्षण सत्राचे उद्घाटन आणि प्रमुख मार्गदर्शन निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार श्रीमती शितल सोलाट यांनी केले.
त्यांनी मतदान प्रक्रियेतील सूक्ष्म बाबी, निवडणूक आयोगाचे नियम, आचारसंहिता, मतदारांना सहाय्य करण्याची योग्य पद्धत, शंका व वाद निरसनाची प्रक्रिया यांवर सविस्तर माहिती दिली.
मतदान यंत्र म्हणजेच EVM आणि VVPAT हाताळणीचे प्रत्यक्ष प्रशिक्षण सहायक निवडणूक निर्णय अधिकारी श्री. अनिल भामरे यांनी घेतले. त्यांनी यंत्रांची तपासणी, सीलिंग, मॉक पोल, त्रुटी निवारण आणि मतदान केंद्रावरील कायदेशीर प्रक्रिया यांचे प्रात्यक्षिक सत्र कर्मचारी व अधिकाऱ्यांना दिले.
अतिरिक्त सहायक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती स्वालिहा मालगावे यांनी मतदान केंद्रांवर वापरावयाच्या घोषणापत्रांचे नमुने, भरण्यात येणारी फॉरमॅट्स, दिवसअखेरीस तयार करावयाचे अहवाल, तसेच मतदान केंद्र अधिकाऱ्यांनी पाळावयाच्या शासकीय कार्यपद्धतीचे सखोल स्पष्टीकरण दिले.
मतदान कर्मचाऱ्यांची क्षमता तपासण्यासाठी ‘चाचणी परीक्षा’
प्रशिक्षणाच्या शेवटी उपस्थित सर्व मतदान कर्मचार्यांची चाचणी परीक्षा घेण्यात आली. यात मतदान प्रक्रिया, EVM वापर, आपत्कालीन परिस्थिती हाताळणी, मतदार मार्गदर्शन, कागदपत्रे भरणे यासंदर्भातील वस्तुनिष्ठ प्रश्न विचारण्यात आले.
या परीक्षेमुळे कर्मचार्यांची तयारी तपासली गेली असून निवडणूक दिवशी कोणतीही त्रुटी किंवा विलंब होऊ नये यासाठी प्रशासनाने ही पद्धत अवलंबली आहे.
2 डिसेंबर 2025 रोजी मतदान – संपूर्ण वाहतूक व साहित्य योजनेची आखणी
भडगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान 2 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होणार आहे.
मतदान साहित्य, EVM संच, VVPAT मशीन, मतदान केंद्रावरील फर्निचर, फॉरमॅट्स, शिक्के, नोंदवही या सर्व वस्तूंचे किट तयार करण्यात आले असून 1 डिसेंबर रोजी सर्व मतदान पथके तालुका क्रीडा संकुलातून मतदान केंद्रांवर रवाना होतील.
यासाठी प्रशासनाने आवश्यक त्या सर्व वाहनांची सोय केली असून वाहनांचे रूट चार्ट, लोडिंग प्रक्रिया आणि सुरक्षा व्यवस्थाही निश्चित करण्यात आली आहे.
3 डिसेंबर 2025 रोजी मतमोजणी — 60 कर्मचारी सज्ज, 7 टेबलांवर 7 ते 8 फेऱ्या
मतदानानंतरची सर्वात महत्वाची प्रक्रिया असलेल्या मतमोजणीचे काम 3 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून तालुका क्रीडा संकुल येथे सुरू होणार आहे.
मतमोजणीसाठी एकूण 60 कर्मचारी नियुक्त झाले असून EVM मतमोजणी 6 टेबलांवर, तर पोस्टल मतपत्रिकांची मतमोजणी 1 स्वतंत्र टेबलावर केली जाणार आहे.
एकूण 7 ते 8 फेऱ्यांमध्ये मतमोजणी होणार असून प्रत्येक फेरीत साधारण 3 ते 4 प्रभागांचे निकाल जाहीर होतील. मतमोजणी हॉलमध्ये सुरक्षा बंदोबस्त, मतमोजणी एजंट यांची बैठक व्यवस्था, सीसीटीव्ही नियंत्रण, मशीन पडताळणी व निकाल फीडिंग यांची पूर्वतयारीही युद्धपातळीवर सुरू आहे.
प्रशासन तयारीस कटिबद्ध — सर्व प्रक्रिया क्रीडा संकुलातूनच
या वर्षीची एक महत्त्वाची बाब म्हणजे मतदानापासून ते मतमोजणीपर्यंतचे सर्व कामकाज एकाच ठिकाणी— भडगाव तालुका क्रीडा संकुल—येथे पार पडणार आहे.
यामुळे कर्मचारी, अधिकारी, वाहतूक व्यवस्था, सुरक्षा आणि लॉजिस्टिक व्यवस्थापन अधिक सुलभ होणार असल्याचे प्रशासनाचा विश्वास आहे.
नगरपरिषदेचे नितीन पाटील यांनी माहिती देताना सांगितले की, “मतदान आणि मतमोजणी पारदर्शक, सुरक्षित आणि अडथळारहित पद्धतीने व्हावी यासाठी प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली आहे. कर्मचारी प्रशिक्षण, साहित्य वाहतूक, सुरक्षा नियोजन, मतमोजणी हॉलची मांडणी या सर्व बाबींवर नजर ठेवली जात आहे.”
