भडगाव प्रतिनिधी :–
मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात तीन वर्षीय निरागस बालिका यज्ञा दुसाने हिच्यावर झालेल्या अत्यंत मानवताविरोधी अत्याचारानंतर तिची दगडाने ठेचून निर्घृण हत्या झाल्याच्या हृदयद्रावक घटनेने राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेचा तीव्र निषेध करण्यासाठी भडगाव सुवर्णकार समाज, विविध सामाजिक संस्था, महिला बचतगट, युवक संघटना तसेच सर्व समाजघटकांच्या वतीने रविवारी भडगाव शहरात भव्य मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले. शहरातील शेकडो नव्हे तर हजारो नागरिकांनी स्वयंप्रेरणेने एकत्र येत या चिमुकलीला श्रद्धांजली वाहत तिच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्याचा निर्धार व्यक्त केला.
मोर्चासाठी उसळले जनसागर
सराफ बाजार चौकातून सकाळी दहाच्या सुमारास मोर्चाची सुरुवात झाली. हातात पीडित बालिकेच्या न्यायासाठी मागणी करणारे फलक, तोंडावर काळ्या पट्ट्या आणि मनात संताप घेऊन विविध समाजातील नागरिक शांततेने एकत्र आले. मोर्चा जसजसा पुढे सरकत गेला तसतशी नागरिकांची गर्दी वाढतच गेली. महिलांचा सहभाग देखील लक्षणीय होता. आई—बहिणींनी केवळ शांततेत चालत राहून समाजातील स्त्री—बालकांवर वाढणाऱ्या अत्याचारांविरुद्ध कडक भूमिका घेण्याचा संदेश दिला.
मोर्चाच्या समारोप स्थळी तहसील कार्यालया समोर नागरिकांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडली. यावेळी संजय सोनार कळवाडीकर,गायत्री पोतदार,योजनाताई पाटील,डॉ.पूनमताई पाटील आदी मान्यवरांनी भावना व्यक्त करतांना सांगितले—
“ही घटना समाजातील प्रत्येक संवेदनशील व्यक्तीला अस्वस्थ करणारी आहे. अशा प्रकरणांना दीर्घकाळ लांबणीवर टाकून न्यायाला विलंब होऊ देऊ नये.या प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात व्हावी. शासनाने उज्वल निकम यांसारख्या ख्यातनाम सरकारी वकिलाची नियुक्ती करावी,जेणेकरून आरोपीस कठोरात कठोर फाशीची शिक्षा लवकरात लवकर मिळेल.”
नागरिकांनी भडगांव तहसीलदार शितल सोलाट व पोलीस निरीक्षक महेश शर्मा यांना निवेदन देत या प्रकरणातील चौकशी जलद गती न्यायालयात चालवुन दोषी आरोपी ला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली.
बालकांवरील अत्याचारांविषयी समाजात भीतीचे वातावरण
या घटनेनंतर शहरात सर्वत्र चर्चा होत असून पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांनी सरकारने अशा घटनांना आळा घालण्यासाठी कठोर कायदे आणि तत्काळ अंमलबजावणीसाठी विशेष यंत्रणा उभी करावी,अशीही मागणी केली. महिला संघटनांनी पुढील काळात बालसुरक्षा, महिला सुरक्षा याबाबत जनजागृती मोहीमा राबवण्याचा मानस व्यक्त केला.
तीन वर्षांच्या चिमुकलीवर झालेल्या अत्याचारामुळे मन हेलावलेल्या नागरिकांनी मौन पाळत समाजाच्या मनात मोठा संदेश दिला
“अशा अमानुष कृत्यांना समाजात जागा नाही; न्याय मिळेपर्यंत आमचा लढा सुरू राहील.”
भडगावचा हा मूक मोर्चा केवळ निषेधाचा नव्हे, तर समाजिक एकतेचा, न्याय प्राप्तीचा आणि बाल सुरक्षेसाठी समाज जागृत असल्याचा एक सशक्त संदेश ठरला. यज्ञा दुसाने हिच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी संपूर्ण शहर एकदिलाने उभे राहिले असून, दोषींना कठोर शिक्षा होईपर्यंत नागरिक संघर्ष सुरू ठेवण्याच्या मनःस्थितीत आहेत.
