भडगाव पोलिसात अज्ञात आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल; जिल्हा पोलिस अधीक्षकांची घटनास्थळी भेट
भडगाव प्रतिनिधी :-
भडगाव तालुक्यातील पिंपरखेड गावात दोन दिवसांच्या अंतराने एकाच तलावात दोन व्यक्तींचे मृतदेह सापडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सलग दोन मृत्यूंमुळे ग्रामस्थांमध्ये शंका निर्माण झाली असून नातेवाईकांच्या तक्रारी नुसार भडगाव पोलिसांनी अखेर अज्ञात इसमां विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १४ नोव्हेंबर रोजी पिंपरखेड शिवारातील तलावात वाल्मीक संजय ह्याळींगे (वय २७) यांचा मृतदेह तरंगताना दिसून आला. माहिती मिळताच स्थानिकांनी पोलिसांना कळविले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढला. प्राथमिक तपासात हा मृत्यू बुडाल्यामुळे झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.
दोन दिवसांतच दुसरा मृतदेह
पहिल्या मृत्यूचा तपास सुरू असतानाच अवघ्या दोन दिवसांनी, १६ नोव्हेंबर रोजी, त्याच तलावात नारायण रामदास ह्याळींगे (वय ५२) यांचा मृतदेह सापडला. एकाच जलाशयात कमी अंतराने दोन मृतदेह आढळल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीसोबतच संशयाचे वातावरण अधिक दाट झाले.
दोन्ही मृतांचा परस्परांशी संबंध असल्याने या मृत्यूंना साध्या दुर्घटना मानणे कठीण असल्याचे नातेवाईकांनी पोलिसांना सांगितले. दोघांना अज्ञात इसमांकडून तलावाकाठी बोलावून मारहाण किंवा अन्य स्वरूपात जीवाला धोका निर्माण करून तलावात फेकण्यात आले असावे, असा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.
खुनाचा गुन्हा दाखल; तपासाला गती
मयत नारायण रामदास ह्याळींगे यांचे पुतणे दीपक देविदास ह्याळींगे यांनी दिलेल्या तक्रारीवरून भडगाव पोलिसात अज्ञात आरोपीविरोधात भा.द.सं. २०२३ चे कलम १०३(१) नुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश शर्मा हे करीत आहेत.
भडगाव पोलिसांनी दोन्ही घटनास्थळांचा पंचनामा केला असून दोन्ही मृतदेहांचे शवविच्छेदन अहवाल प्रलंबित आहे. अहवाल मिळाल्यानंतर मृत्यूंचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे.






