भडगाव शहरात नगरपालिकेपूर्वी मोठी राजकीय उलथापालथ.!!!
भडगाव प्रतिनिधी :-
भडगाव नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय समीकरणे दिवसेंदिवस बदलत आहेत. याच पार्श्वभूमीवर आज भडगाव शहरात मोठी राजकीय उलथापालथ घडली असून, माजी नगरसेवक व भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते इसहाक मलिक यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना (शिंदे गट) मध्ये जाहीर प्रवेश केला आहे.
हा प्रवेश सोहळा आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत उत्साहात पार पडला. या वेळी मा नगराध्यक्ष राजेंद्र पाटील,युवा जिल्हा प्रमुख लखीचंद पाटील, जिल्हा परिषद सदस्य भुरा आप्पा, अतुल भाऊ परदेशी, तसेच स्थानिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
इसहाक मलिक हे भडगाव शहरात सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय असून, त्यांनी अनेक वर्षे नगरसेवक म्हणून काम करत शहरातील प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या नेतृत्वाखालील कार्यकर्त्यांचा मजबूत गट शिवसेना (शिंदे गटात) प्रवेशल्यामुळे या पक्षाची भडगावातील संघटनात्मक ताकद लक्षणीयरीत्या वाढली असल्याचे राजकीय वर्तुळात म्हटले जात आहे.
प्रवेश सोहळ्यावेळी आमदार किशोर पाटील यांनी इसहाक मलिक यांच्या निर्णयाचे स्वागत करत सांगितले की, “भाऊसाहेब मलिक यांच्यासारख्या अनुभवी आणि जनतेच्या मनात घर केलेल्या नेत्यांच्या सहभागामुळे शिवसेना शिंदे गट आणखी बळकट होईल. आगामी नगरपालिकेच्या निवडणुकीत आपण सर्वजण एकजुटीने काम करून भडगाव शहराच्या विकासाला गती देऊ,”असे ते म्हणाले.
कार्यक्रमाला शहरातील अनेक मान्यवर, शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभास्थळी घोषणाबाजी आणि जयघोषांच्या गजरात वातावरण उत्साहवर्धक झाले होते.
या प्रवेशामुळे भडगावच्या आगामी नगरपालिकेच्या निवडणुकीत नवे राजकीय गणित तयार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
