मंडप सजला… पण टायर फुटल्याने नवरीसह वहिनीचा मृत्यू; पाचोरा तालुक्यात हृदयद्रावक अपघात.!!!
पाचोरा प्रतिनिधी :
लग्नाची धामधूम सुरू असतानाच अचानक घडलेल्या भीषण अपघाताने एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील बांबरुड (महादेव) गावाजवळ कारचा टायर फुटल्याने झालेल्या अपघातात होणारी नवरी आणि तिच्या वहिनीचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने अमरावती जिल्ह्यातील परतवाडा परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, परतवाडा येथील शिखा बेलसरे हिचा साखरपुडा 21 एप्रिल रोजी पार पडला होता. 8 मे रोजी तिचा विवाह होणार होता. घरात लग्नाची जोरदार तयारी सुरू होती. मंडप उभारण्यात आला होता आणि नातेवाईकांमध्ये आनंदाचे वातावरण होते.
दरम्यान, लग्नाची पहिली पत्रिका देवाच्या चरणी अर्पण करण्यासाठी बेलसरे कुटुंब नाशिक येथील सप्तशृंगी गडावर गेले होते. देवदर्शन आटोपून परतत असताना पाचोरा-भडगाव मार्गावरील बांबरुड गावाजवळ त्यांच्या कारचा टायर अचानक फुटला. त्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून कारचा भीषण अपघात झाला.
या अपघातात शिखा बेलसरे आणि तिची वहिनी मीना मानकर यांचा जागीच मृत्यू झाला. तर शुभम बेलसरे आणि सुनील मानकर हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू केले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.
काही दिवसांवर असलेल्या विवाहामुळे घरात आनंदाचे वातावरण असताना या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. ज्या घरातून काही दिवसांत वधूची पाठवणी होणार होती, त्या घरात आता अंत्यविधीची तयारी करण्याची वेळ आल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.
या अपघातामुळे दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.





