चाळीसगाव प्रतिनिधी :-
चाळीसगाव, दि. ५ डिसेंबर — चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत चालू वर्षभरात गहाळ झालेल्या मोबाईल फोनच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत पोलिस प्रशासनाने गहाळ मोबाईल शोध मोहिमेची गती वाढविली होती. या मोहिमेला मोठे यश मिळवत चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी एकूण ११ मोबाईल फोन (एकूण अंदाजे किंमत ₹१,१०,000) हस्तगत केले असून हे मोबाईल आज त्यांच्या मालकांना परत करण्यात आले.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेवरून कारवाई
गहाळ मोबाईल शोध मोहीम प्रभावीपणे राबवण्यासाठी पोलिस अधिक्षक जळगाव मा. डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलिस अधिक्षक चाळीसगाव मा. सौ. कविता नेरकर आणि उपविभागीय पोलिस अधिकारी चाळीसगाव भाग मा. श्री विजयकुमार ठाकुरवाड यांनी नियमितपणे मासिक गुन्हे आढावा बैठकीत सूचना दिल्या होत्या. गहाळ मोबाईलच्या तक्रारींचे तांत्रिक विश्लेषण करून संबंधितांना न्याय मिळवून देण्याचे आदेश वरिष्ठांनी दिले होते.
सायबर पोलिसांची तांत्रिक मदत
मोबाईल धारकांनी तक्रार दाखल करताना दिलेल्या माहितीच्या आधारे सायबर पोलिस स्टेशन जळगाव यांनी तांत्रिक विश्लेषण करून मोबाईलचा लोकेशन व वापराचे तपशील शोधून काढले. सायबर पोलिसांनी मिळविलेल्या माहितीच्या आधारावर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पथकाने विविध ठिकाणी जाऊन तपास सुरू केला.
मोबाईल हस्तगत व तक्रारदारांना परत
या संयुक्त तपास मोहिमेतून ग्रामीण पोलिसांनी ११ मोबाईल हस्तगत केले. आज दिनांक ०५ डिसेंबर २०२५ रोजी चाळीसगाव उपविभागीय पोलिस कार्यालयात आयोजित कार्यक्रमात हे मोबाईल अप्पर पोलिस अधिक्षक मा. सौ. कविता नेरकर व उपविभागीय पोलिस अधिकारी मा. श्री विजयकुमार ठाकुरवाड यांच्या हस्ते तक्रारदारांना परत करण्यात आले. मोबाईल परत मिळाल्याने लाभार्थी नागरिकांनी पोलिसांचे मनापासून आभार व्यक्त केले.
कारवाईत विशेष सहभाग
या मोहिमेत चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनचे सपोनि नितीन पाटील, सफौ युवराज नाईक, पोहेकॉ संदीप पाटील, पोकॉ विजय पाटील, पोकाँ बाळू बाविस्कर यांच्यासह सायबर पोलीस स्टेशन जळगाव येथील पोना ईश्वर पाटील, पोकॉ गौरव पाटील आणि पोकॉ मिलिंद जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले.
पोलिसांची नागरिकांना विनंती
गहाळ झालेल्या मोबाईलची तक्रार त्वरित नोंदवावी तसेच मोबाईलचा आयएमईआय क्रमांक सुरक्षित ठेवावा, असे आवाहन ग्रामीण पोलिसांनी नागरिकांना केले आहे. त्वरित तक्रार नोंदवल्यास तांत्रिक तपास जलद होतो व मोबाईल शोधण्याची शक्यता वाढते, असेही पोलिसांनी सांगितले.
