पाचोरा प्रतिनिधी:-
तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वरखेडी परिसरात एका इसमाने आपल्या राहत्या घरात अनैतिक देहव्यापाराचा व्यवसाय सुरू केल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या बेकायदेशीर धंद्यामुळे परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचे समजताच सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा यांनी ही माहिती त्वरित पाचोरा उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिली.
वरिष्ठांच्या आदेशानुसार पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र पथक तयार करण्यात आले. पथकात API कल्याणी वर्मा, पोलीस हेडकॉन्स्टेबल अतुल पवार, अभिजित निकम, पोलीस नाईक राहुल बेहरे, पोलीस कॉन्स्टेबल नामदेव इंगळे, अमोल पाटील, दीपक सोनवणे, महिला पोलीस कॉन्स्टेबल योगिता चौधरी, वाहन चालक पोलीस कॉन्स्टेबल सागर पाटील यांचा समावेश होता. तसेच दोन पंच व पंटर यांनाही कारवाईसाठी पथकात सामील करण्यात आले.
गोपनीय माहिती आणि पूर्वतयारीनंतर पथकाने वरखेडी येथे सापळा रचून पंटरच्या माध्यमातून आरोपीच्या घरात प्रवेश मिळवला. परिस्थितीची खात्री झाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकला असता, हैदर शहा रशिद शहा (वय 45, रा. वरखेडी) हा स्वतःच्या फायद्यासाठी आपल्या घरात महिलांना बोलावून अल्प मोबदल्यात त्यांच्यामार्फत देहव्यापार चालवीत असल्याचे दिसून आले. आरोपीला पोलिसांनी घटनास्थळीच रंगेहाथ पकडले.
या कारवाईनंतर पोलीस हेडकॉन्स्टेबल अतुल पवार यांच्या फिर्यादीवरून पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा क्र. 352/2025 असा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्याच्यावर स्त्रिया व मुलींचा अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम 1956 अंतर्गत कलम 3, 4 आणि 5 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनास्थळावरून पोलिसांनी आवश्यक पंचनामा करून पुरावे जप्त केले. आरोपीकडून महिलांचे शोषण होत असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले असून पोलिसांकडून आणखी चौकशी सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास API कल्याणी वर्मा यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
वरखेडी परिसरात काही दिवसांपासून अवैध धंद्यांची चर्चा सुरू होती. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांना आळा बसणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत असून स्थानिक नागरिकांनी या कारवाईचे स्वागत केले आहे.
