पाचोरा प्रतिनिधी :-
आगामी सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पाचोरा शहरात मतदानाचे प्रमाण वाढवण्यासाठी अल सुफा इंटरनॅशनल स्कूलतर्फे विशेष जनजागृती अभियानाची सुरुवात करण्यात आली. “प्रत्येक पात्र मतदाराने मतदान करणे हे लोकशाही बळकट करण्याचे कर्तव्य आहे”, हा संदेश अधोरेखित करत विद्यार्थ्यांनी व्यापक जनसंपर्क कार्यक्रम राबवला.
शाळेतील विद्यार्थ्यांनी शहरातील प्रमुख मार्गांवर भव्य जनजागृती रॅली काढली. “माझा मताधिकार, माझा अभिमान”, “पहिले मतदान, मगच इतर काम” अशी घोषवाक्ये देत विद्यार्थ्यांनी शहरात मतदानाचा संदेश घुमवला. रॅलीसोबतच माहितीपर नाटिका, सांस्कृतिक कार्यक्रम आणि छोटेखानी जनजागृती सादरीकरणे आयोजित करण्यात आली.
अभियानाद्वारे नागरिकांना मतदानाचे महत्त्व, योग्य उमेदवाराच्या निवडीचे भान आणि लोकशाही प्रक्रियेतील सक्रीय सहभागाची गरज याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. शिक्षक, व्यवस्थापन सदस्य आणि स्थानिक स्वयंसेवकांनी सहभागी होत विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले.
शहरातील चौक, बाजारपेठा, शाळा–महाविद्यालये आणि वर्दळीच्या भागांत संदेशफलकांचे प्रदर्शन, माहितीपत्रक वितरण, विविध जनसंपर्क उपक्रमांद्वारे मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात आली. या उपक्रमाला नागरिक, सामाजिक संस्थांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
अल सुफा इंटरनॅशनल स्कूल पुढील काही दिवसांत मतदार नोंदणी मार्गदर्शन शिबिरे, युवा संवाद सत्रे, प्रात्यक्षिक मतदान प्रक्रिया तसेच सोशल मीडिया कॅम्पेन राबवणार असल्याची माहिती देण्यात आली. लहान बाळ गोपाळणीसारख्या विद्यार्थ्यांनीही या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला.
या अभियानामुळे पाचोऱ्यातील मतदानाचे प्रमाण आगामी निवडणुकांत निश्चितच वाढेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.