भडगाव प्रतिनिधी :-
भडगाव तालुक्यातील राजकीय घडामोडींना वेग देणारी महत्वाची घटना आज घडली. भारतीय जनता युवा मोर्चाचे माजी शहराध्यक्ष निलेश साहेबराव महाजन यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात मोठ्या उत्साहात जाहीर प्रवेश केला. आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या नेतृत्वावर, विकासकामांवर आणि सर्वसामान्य जनतेशी असलेल्या थेट व संवेदनशील संवाद शैलीवर विश्वास ठेऊन हा प्रवेश करण्यात आल्याचे या प्रसंगी स्पष्ट करण्यात आले.
कार्यक्रमात प्रवेश घेणाऱ्या नव्या कार्यकर्त्यांचे शिवबंधन बांधून आणि गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. निलेश महाजन यांनी सांगितले की, “आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या माध्यमातून भडगाव तालुक्यात होत असलेले विकासकाम, युवकांना मिळणारे प्रोत्साहन आणि सर्वसामान्यांसाठी सदैव उभे राहण्याची त्यांची भूमिका पाहून आम्ही शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.”
या कार्यक्रमाला शिवसेना युवा जिल्हाप्रमुख लखीचंद पाटील, माजी प्रथम नागराध्यक्ष शशिकांत येवले, डॉ. प्रमोद पाटील, तालुका शाखेचे विविध पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी नव्या कार्यकर्त्यांचे स्वागत करून त्यांच्या आगमनामुळे पक्षाला नवी ऊर्जा आणि बळ मिळाल्याचे नमूद केले.
लखीचंद पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “भडगाव तालुक्यातील युवकांचा वाढता विश्वास ही आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या कार्यशैलीची पावती आहे. नव्या कार्यकर्त्यांच्या सहभागामुळे शिवसेनेची ताकद आणखी वाढणार आहे.”
या प्रवेशामुळे भडगाव तालुक्यातील राजकीय समीकरणांमध्ये बदल घडू शकतो, तसेच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश शिवसेनेसाठी महत्त्वपूर्ण ठरू शकतो, कार्यक्रमाची सांगता शिवसैनिकांच्या घोषणांनी आणि उत्साहवर्धक वातावरणात करण्यात आली.
