भडगाव प्रतिनिधी :-
भडगाव नगरपरिषद निवडणुकीची रणधूमाळी सुरू असताना विविध पक्षांनी प्रचारमोहीम वेगात सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपतर्फे भडगावात उद्या मोठ्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री रवींद्र चव्हाण हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
ही सभा गुरुवार, दि. २७ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता भडगाव शहरातील आझाद चौकात होणार असून पक्षाच्या प्रचारमोहीमेची दणदणीत सुरुवात यानिमित्ताने होणार आहे. लोकनियुक्त नगराध्यक्ष सुशीला ताई शांताराम पाटील तसेच सर्व उमेदवार सभेला उपस्थित राहणार आहेत.
सभेच्या तयारीसाठी भाजपचे जळगाव जिल्ह्यातील प्रमुख नेते, पदाधिकारी आणि स्थानिक कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत. सोशल मीडियावरही प्रचाराला गती मिळाली असून चव्हाण यांच्या आगमनामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. सभेला मोठी गर्दी अपेक्षित असल्याची माहिती भाजपच्या वर्तुळातून देण्यात आली.
नगरपरिषद निवडणुकीत भाजप आपले बळ वाढवण्याच्या रणनीतीत असून या सभेत उमेदवारांची मूलभूत भूमिका, आगामी विकास आराखडे तसेच स्थानिक प्रश्नांवर पक्षाची भूमिका स्पष्ट करण्यात येणार आहे. शहरातील पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, मूलभूत सुविधा आणि नागरिकांच्या विविध अडचणींसंदर्भात उपाययोजना जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शहर व तालुका स्तरावरील सर्व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर मेहनत घेत असून नागरिकांनी उपस्थित राहून सभा यशस्वी करावी, असे आवाहन भाजप नेतृत्वाकडून करण्यात आले आहे.
