भडगाव प्रतिनिधी :—
वाडे, बांबरुड प्र. ब, गोंडगाव परिसरात उजव्या कालव्याला या पावसाळ्यात पुराच्या पाण्यामुळे तीन ठिकाणी भगदाड पडले असून कालव्याच्या दुरुस्तीचे काम तातडीने करण्यात यावे, अशी मागणी पत्रकार श्री. अशोकबापू परदेशी यांनी गिरणा पाटबंधारे विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे. हे निवेदन विभागाचे शाखा अभियंता श्री. सुभाष चव्हाण यांना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, यावर्षी गिरणा धरण १०० टक्के क्षमतेने भरले असून रब्बी हंगामासाठी भडगाव तालुक्यात मुबलक पाणी उपलब्ध होऊ शकते. रब्बी पिकांची पेरणी सुरू असताना उजव्या कालव्याला अजूनही पाण्याचे आवर्तन सोडण्यासाठी इच्छित नियोजन झालेले नाही. परिणामी शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.
कालव्यातील गंभीर अडचणी
वाडे, बांबरुड प्र. ब आणि गोंडगाव भागात तीन ठिकाणी कालवा फुटून मोठी भगदाडे
कालव्यात मोठ्या प्रमाणात गाळ साचलेला
कालव्यालगत काटेरी झुडपे, झाडे वाढून अस्वच्छता
मेन पाटचार्या आणि शेतात जाणाऱ्या पाटचार्या जमिनदोस्त व निकृष्ट अवस्थेत
शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या
कालव्यावरील सर्व भगदाडे तात्काळ बुजवणे व दुरुस्ती करणे
जेसीबी मशीनने कालवा व पाटचार्यांची स्वच्छता व खोदकाम
कालव्यातील गाळ काढून दोन्ही बाजूने माती टाकून कालवा मजबूत करणे
उजव्या कालव्याला लवकर पाण्याचे आवर्तन सोडण्याचे नियोजन
या कालव्याच्या पाण्याचा लाभ वाडे, बांबरुड प्र. ब, गोंडगाव, लोणपिराचे, बोरनार, कनाशी, देव्हारी, बोदर्डे, निंभोरा, कोठली, नगरदेवळा स्टेशन, वडगाव, बाळद, भडगाव या गावांतील रब्बी, बागायत आणि फळबागायत पिकांना मोठ्या प्रमाणावर होणार आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाकडून पाणी सोडण्याची आतुरता व्यक्त केली जात आहे.
