भडगाव प्रतिनिधी :-
भडगाव नगरपरिषद निवडणूक २०२५ दरम्यान अनुदानित शैक्षणिक संस्थेतील शिक्षक व कर्मचारी एका उमेदवाराच्या प्रचारात सहभागी होत असल्याची गंभीर तक्रार दाखल झाली आहे. कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्थेतील काही कर्मचारी राजकीय प्रचारासाठी वापरले जात असल्याचा आरोप लखीचंद प्रकाश पाटील यांनी राज्य निवडणूक आयोगासह विविध शासकीय खात्यांकडे केला आहे.
तक्रारीनुसार, नगरपरिषद प्रभाग क्रमांक ८(अ) हा महिलांसाठी राखीव असून या प्रभागातून लखीचंद पाटील यांच्या पत्नी समीक्षा पाटील या शिवसेनेच्या उमेदवार आहेत. त्याच प्रभागातून पूनम प्रशांत पाटील या भाजपाच्या उमेदवार असून दोघींमध्ये सरळ सामना होत आहे. तक्रारदारांच्या मते, पूनम पाटील या संस्थेचे चेअरमन प्रताप पाटील यांच्या कन्या असल्याने शिक्षक व कर्मचार्यांचा त्यांच्या उमेदवारीसाठी थेट वापर केला जात आहे.
तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, उमेदवारी अर्जासाठी आवश्यक कागदपत्रांची तयारी, अर्ज दाखल करताना उपस्थिती, छाननीच्या दिवशी निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयात कर्मचार्यांची हजेरी, तसेच प्रभागात फिरून प्रचार करण्यासाठी संस्थेतील काही कर्मचार्यांची नेमणूक करण्यात आल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे. यापैकी काही कर्मचारी कार्यालयीन वेळेत शाळेत हजर असल्याचे दाखवत प्रत्यक्षात प्रचारात सहभागी होत असल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.
अनुदानित संस्थेतील कर्मचारी शासनाचा पगार घेऊन राजकीय प्रचारात गुंतले असल्याने हे निवडणूक आचारसंहितेचे व सेवाशर्तींचे उल्लंघन असल्याचे पाटील यांनी नमूद केले आहे. अशा प्रकारे शैक्षणिक कामकाजावर परिणाम होऊन विद्यार्थ्यांच्या हक्कांचे नुकसान होत असल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला आहे.
पाटील यांनी या प्रकरणात व्हिडिओ स्वरूपातील पुरावे जोडल्याचे सांगितले असून संबंधितांवर तात्काळ चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. ही तक्रार राज्य निवडणूक आयोग, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, नगरपरिषदेचे निवडणूक निर्णय अधिकारी आणि पंचायत समितीतील शिक्षण अधिकारी यांच्याकडे पाठवण्यात आली आहे.
या तक्रारीमुळे प्रभाग क्रमांक ८(अ) मधील निवडणूक अधिक तापली असून आगामी काही दिवसांत प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
