धुळे शहरासाठी ‘ट्रॅफिक अॅक्शन प्लॅन’; 20 जुलैपासून वाहतूक अभ्यासाला सुरुवात
धुळे जिल्हा प्रतिनिधी :- फहीम शाह
धुळे शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीवर प्रभावी नियंत्रण मिळवून नागरिकांना सुरक्षित व सुरळीत वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी धुळे शहर वाहतूक शाखेने महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला आहे. सोमवार, दि. 20 जुलै 2026 पासून शहरातील वाहतुकीचा सखोल अभ्यास (Traffic Study) सुरू करण्यात येणार असून, त्याआधारे धुळे शहरासाठी सर्वसमावेशक “ट्रॅफिक अॅक्शन प्लॅन” तयार करण्यात येणार आहे.
या अभ्यासादरम्यान शहरातील विविध चौक, प्रमुख रस्ते आणि गर्दीच्या ठिकाणी कोणत्या वेळेत, कोणत्या कारणांमुळे वाहतूक कोंडी निर्माण होते, याचे बारकाईने निरीक्षण केले जाईल. अवैध पार्किंग, रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स व मालवाहतूक वाहनांमुळे होणारे अडथळे, रिक्षा वाहतुकीचे व्यवस्थापन, अवैध अतिक्रमणे, हातगाड्या व फेरीवाल्यांमुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी तसेच इतर वाहतूक समस्यांचा सर्वंकष अभ्यास केला जाणार आहे.
वाहतूक अभ्यासानंतर ट्रान्सपोर्ट युनियन, रिक्षा युनियन, हातगाडी व लोटगाडी युनियन, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एमएसआरटीसी), व्यापारी संघटना आणि इतर संबंधित घटकांशी समन्वय साधून चर्चा करण्यात येणार आहे. त्यानंतर शहराच्या गरजांनुसार दीर्घकालीन व परिणामकारक ‘ट्रॅफिक अॅक्शन प्लॅन’ तयार केला जाईल.
या उपक्रमाचा उद्देश केवळ वाहतूक कोंडी कमी करणे एवढाच नसून, रस्ते सुरक्षितता वाढविणे, अपघातांचे प्रमाण कमी करणे, वाहतुकीत शिस्त निर्माण करणे आणि नागरिकांना अधिक सुरक्षित, सुलभ व गतिमान वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देणे हा आहे.
महाराष्ट्र डायरी विशेष
“वाहतूक कोंडीमुक्त व सुरक्षित धुळे” या संकल्पनेला प्रत्यक्षात उतरविण्याच्या दिशेने धुळे शहर वाहतूक शाखेचे हे पाऊल महत्त्वपूर्ण मानले जात असून, नागरिकांनीही वाहतूक नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.





