राज्यस्तरीय शालेय थायबॉक्सिंग स्पर्धेत भडगाव व चाळीसगावच्या खेळाडूंची घवघवीत कामगिरी.!!!
भडगाव प्रतिनिधी :-
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सांगली तसेच सांगली जिल्हा थायबॉक्सिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने १७ व १९ वर्षांखालील मुला-मुलींसाठी राज्यस्तरीय शालेय थायबॉक्सिंग क्रीडा स्पर्धा २०२५–२६ चे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा दि. १६ ते १८ जानेवारी २०२६ दरम्यान स्नेह मेळावा अंतर्गत श्री लक्ष्मणरावजी सैनिक पॅटर्न स्कूल व ज्युनियर कॉलेज, मग्रेराजुरी, ता. तासगाव, जि. सांगली येथे मोठ्या उत्साहात पार पडली.
या राज्यस्तरीय स्पर्धेत भडगाव व चाळीसगाव तालुक्यातील खेळाडूंनी आपल्या उत्कृष्ट कौशल्याचे दर्शन घडवत पदकांची लक्षणीय कमाई केली. विविध वजनगटांमध्ये खेळाडूंनी मिळवलेल्या यशामुळे जळगाव जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्राचा नावलौकिक राज्य पातळीवर वाढला आहे.
भडगाव येथील तनवीर रझाक मण्यार (१९ वर्षांखालील, ४४ ते ४८ किलो) यांनी दमदार खेळ करत रौप्य पदक पटकावले. ते श्री साई समर्थ कला व ज्युनियर कॉलेज, भडगाव येथील विद्यार्थी आहेत.
त्याचप्रमाणे प्रतीक सतीश दाभाडे (१९ वर्षांखालील, +७५ किलो) यांनी उत्कृष्ट कामगिरी करत कास्य पदक मिळवले. ते सौ. जयश्री गणेश पूर्णपात्री कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, भडगाव येथील विद्यार्थी आहेत.
जुनेद खान शाकीर खान (१४ वर्षांखालील, ३६ ते ४० किलो) यांनी संघर्षपूर्ण लढतीत कास्य पदक पटकावले. ते वाय. एम. खान उर्दू स्कूल, भडगाव येथील विद्यार्थी आहेत.
आर्यन जुलाल सोनवणे (१४ वर्षांखालील, ४० ते ४४ किलो) यांनी आपल्या तंत्रशुद्ध खेळाच्या जोरावर रौप्य पदक जिंकले. ते न्यू इंग्लिश मीडियम स्कूल, भडगाव येथील विद्यार्थी आहेत.
चाळीसगाव येथील फैजान अकरम शेख (१९ वर्षांखालील, ६० ते ६५ किलो) यांनी कास्य पदक पटकावत चाळीसगावचा नावलौकिक वाढवला. तसेच ओम गौतम भोयर (१७ वर्षांखालील, ५२ ते ५६ किलो) यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत रौप्य पदक पटकावले. हे दोन्ही खेळाडू के. आर. कोतकर ज्युनियर कॉलेज, चाळीसगाव येथील विद्यार्थी आहेत. याशिवाय आर्यन निलेश ब्राह्मणकर यांनीही स्पर्धेत सहभाग नोंदवत अनुभव मिळवला.
या सर्व खेळाडूंना प्रशिक्षक अबरार खान (सहसचिव, थाय बॉक्सिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र) यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच महाराष्ट्राचे कोच शाहरुख नजीर मण्यार यांनी तांत्रिक मार्गदर्शन करून खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवला. स्पर्धेतील पंचगणनेत आयन खान, चाळीसगाव यांनी जबाबदारी पार पाडत योगदान दिले.
या यशाबद्दल जळगाव जिल्हा थाय बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष हाजी जाकीर कुरेशी, उपाध्यक्ष शाम पाटील तसेच पदाधिकारी डॉ. वसीम मिर्झा, सौरभ पाटील, संतोष पाटील, सौरभ देशमुख, अजगर खान, हाजी खलील शेख यांनी खेळाडू, प्रशिक्षक व पालकांचे अभिनंदन केले असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
राज्यस्तरीय शालेय थायबॉक्सिंग स्पर्धेत भडगाव व चाळीसगावच्या खेळाडूंनी मिळवलेले हे यश आगामी काळात अधिक खेळाडूंना प्रेरणादायी ठरणार असून परिसरातील क्रीडा चळवळीला नवी दिशा देणारे ठरले आहे.
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : मराठी संस्कृतीचा अभिमान मानल्या जाणाऱ्या आणि ऐतिहासिक वारशाची साक्ष देणाऱ्या मोडी लिपीच्या संवर्धन व पुनरुज्जीवनासाठी “श्री शिवाजी ज्ञानपीठ इंटरनॅशनल” आणि “शिवस्वराज्य प्रबोधिनी प्रतिष्ठान” यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोडी लिपी – मोफत शिकवणी वर्गाचा १८ जानेवारी २०२६ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. मोडी लिपीचा प्रसार व्हावा आणि तिचे महत्त्व नव्या पिढीपर्यंत पोहोचावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
