कासोद्यात दूषित पाण्याचा पुरवठा नागरिकांच्या आरोग्यावर संकट.!!!

कासोद्यात दूषित पाण्याचा पुरवठा नागरिकांच्या आरोग्यावर संकट.!!!कासोद्यात दूषित पाण्याचा पुरवठा नागरिकांच्या आरोग्यावर संकट

कासोदा प्रतिनिधी (शैलेंश पांडे) :-

उन्हाळ्याचा कडाका वाढत असताना कासोदा गावात नागरिकांना दूषित व दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा होत असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. वॉर्ड क्रमांक १ मधील शेलार गल्ली (गढी परिसर) येथे रविवारी दि. २६ एप्रिल नळाद्वारे आलेले पाणी गढूळ व दुर्गंधीयुक्त असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

गावात आधीच १५ ते २० दिवसांच्या अंतराने पाणीपुरवठा केला जातो. त्यातही अशा निकृष्ट दर्जाच्या पाण्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. विशेषतः उन्हाळ्यात पाण्याची टंचाई असताना उपलब्ध साठ्याचे योग्य शुद्धीकरण न करता थेट पुरवठा केला जात असल्याची शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

गढूळ पाणी, शेवाळ व कचरा आढळला

गेल्या काही दिवसांपासून गावातील विविध भागांत नळाद्वारे येणारे पाणी गढूळ असून त्यामध्ये शेवाळ, कचरा व इतर घाण मिसळलेली दिसत आहे. हे पाणी पिण्यायोग्य नसून घरगुती वापरासाठीही अयोग्य ठरत आहे. नागरिकांनी पाणी साठवून ठेवले असता त्यातून तीव्र दुर्गंधी येत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत.

जलजन्य आजारांचा धोका

दूषित पाण्यामुळे गावात जलजन्य आजारांचा धोका वाढला आहे. लहान मुले व वृद्धांमध्ये उलट्या, जुलाब, पोटदुखी यांसारख्या तक्रारी वाढल्याचे नागरिक सांगतात. खासगी दवाखान्यांमध्ये रुग्णसंख्या वाढत असल्याचे चित्र असून, परिस्थिती गंभीर बनत चालली आहे.

“पाणीपट्टी भरूनही स्वच्छ पाणी नाही”

“आम्ही नियमित पाणीपट्टी भरतो, तरीही आम्हाला शुद्ध पाणी मिळत नाही. प्रशासनाने तात्काळ याकडे लक्ष द्यावे,” अशी मागणी महिला वर्गाकडून करण्यात येत आहे.

ग्रामपंचायतीकडे दुर्लक्षाचे आरोप

या समस्येबाबत ग्रामपंचायतीकडे वारंवार तोंडी तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, असा आरोप नागरिकांनी केला आहे. पाणी शुद्धीकरणासाठी वापरली जाणारी यंत्रणा कार्यरत आहे का, क्लोरीनचा वापर योग्य प्रमाणात केला जातो का, याची चौकशी करण्याची मागणी होत आहे.

आमदारांकडून हस्तक्षेपाची अपेक्षा

पारोळा एरंडोल विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोलदादा पाटील यांनी या प्रकरणात लक्ष घालून कासोदा गावात शुद्ध व नियमित पाणीपुरवठा सुनिश्चित करावा, तसेच संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

जळगाव जिल्हाध्यक्षपदी हेमकांत गायकवाड यांची निवड; अन्याय, अत्याचार व भ्रष्टाचाराविरोधात संघटित लढ्याचा निर्धार

जळगाव जिल्हाध्यक्षपदी हेमकांत गायकवाड यांची निवड; अन्याय, अत्याचार व भ्रष्टाचाराविरोधात संघटित लढ्याचा निर्धार

जळगाव जिल्हाध्यक्षपदी हेमकांत गायकवाड यांची निवड; अन्याय, अत्याचार व भ्रष्टाचाराविरोधात संघटित लढ्याचा निर्धारजळगाव जिल्हाध्यक्षपदी हेमकांत गायकवाड यांची निवड; अन्याय, अत्याचार व भ्रष्टाचाराविरोधात संघटित लढ्याचा निर्धार
जळगाव : अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी हेमकांत गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे. संघटनेची बैठक दिनांक १९ एप्रिल २०२६ रोजी पार पडली. यावेळी संस्थापक अध्यक्ष सौदागर महमदरफी यांनी गायकवाड यांची निवड जाहीर करून त्यांना अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान केले.
या बैठकीत संघटनेच्या आगामी कार्याचा आराखडा स्पष्ट करण्यात आला. महाराष्ट्रभर माहिती अधिकार, मानवी हक्क, पत्रकार संरक्षण, भ्रष्टाचार निर्मूलन, ग्राहक संरक्षण तसेच कायद्याचा प्रचार आणि प्रसार करण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे नागरिक व शासकीय घटकांना माहिती अधिकाराचे प्रशिक्षण देण्याची महत्त्वपूर्ण योजना राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
पत्रकार आणि माहिती अधिकार कार्यकर्त्यांवर होणारे खोटे गुन्हे व हल्ले याविरोधात संघटितपणे, लोकशाही मार्गाने लढा उभारण्यात येणार असून कार्यकर्त्यांचे सक्षम जाळे निर्माण केले जाणार आहे. तसेच माहिती अधिकार कायद्याचा प्रभावी वापर करून भ्रष्ट नोकरशाहीचा पर्दाफाश करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, वैद्यकीय क्षेत्र तसेच सरकारी कामकाजामध्ये कुठेही भ्रष्टाचार आढळल्यास त्याविरोधात तक्रारी नोंदवून उपोषण व आंदोलनाच्या माध्यमातून संघर्ष केला जाईल, अशी माहिती संस्थापक अध्यक्ष सौदागर महमदरफी यांनी दिली.
दरम्यान, हेमकांत गायकवाड यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

आमडदे येथे फिरते विधी न्यायालय व कायदेविषयक जनजागृती शिबिर संपन्न

आमडदे येथे फिरते विधी न्यायालय व कायदेविषयक जनजागृती शिबिर संपन्न

आमडदे येथे फिरते विधी न्यायालय व कायदेविषयक जनजागृती शिबिर संपन्नआमडदे येथे फिरते विधी न्यायालय व कायदेविषयक जनजागृती शिबिर संपन्न

भडगाव :- (जावेद शेख) दिनांक 24 एप्रिल 2026 रोजी भडगाव तालुक्यातील आमडदे येथे फिरते विधी न्यायालय व कायदेविषयक जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. विधी सेवा समिती भडगाव व वकील संघ भडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.

सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भडगाव न्यायालयाच्या न्यायाधीश श्रीमती राजळे मॅडम उपस्थित होत्या. यावेळी भडगाव वकील संघाचे अध्यक्ष बी. आर. पाटील वकील, उपाध्यक्ष गणेश वेलसे वकील तसेच निलेश तिवारी, हेमंत कुलकर्णी, बी. आर. ठाकरे, घनश्याम मोरे आदी विधीज्ञ उपस्थित होते.

फिरत्या लोक न्यायालयाचे पंच म्हणून अॅड. सचिन भोसले यांनी कामकाज पाहिले. कार्यक्रमास ग्रामपंचायत अधिकारी, अंगणवाडी सेविका व ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. न्यायालयीन कर्मचारी सचिन रानडे, अनिल गोधने, दीपक पाटील व आयाज मुल्ला यांनीही आयोजनात महत्त्वाची भूमिका बजावली.

या शिबिरात उपस्थित विधीज्ञ व न्यायाधीशांनी विविध कायदेशीर तरतुदी, भारतीय संविधान तसेच महिला व बालकांशी संबंधित कायद्यांविषयी मार्गदर्शन केले. नागरिकांमध्ये कायद्याबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम उपयुक्त ठरला.

सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विधी सेवा समिती भडगाव व वकील संघ भडगाव यांनी अथक परिश्रम घेतले.

'वंद्य वंदे मातरम्’च्या सहाव्या आवृत्तीचे उत्साहपूर्ण अनावरण

‘वंद्य वंदे मातरम्’च्या सहाव्या आवृत्तीचे उत्साहपूर्ण अनावरण

‘वंद्य वंदे मातरम्’च्या सहाव्या आवृत्तीचे उत्साहपूर्ण अनावरण'वंद्य वंदे मातरम्’च्या सहाव्या आवृत्तीचे उत्साहपूर्ण अनावरण

कल्याण (गुरुदत्त वाकदेकर): जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने अक्षरमंच प्रकाशनतर्फे डॉ. योगेश जोशी लिखित ‘वंद्य वंदे मातरम्’ या पुस्तकाच्या सहाव्या आवृत्तीचे अनावरण उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. प्रा. गजेंद्र दीक्षित, प्रा. शैलेश रेगे आणि लेखक हेमंत नेहते यांच्या हस्ते पुस्तकाचे अनावरण करण्यात आले.

‘वंदे मातरम्’ या गीताला ७ नोव्हेंबर २०२५ रोजी १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर युवा पिढीपर्यंत त्याचा इतिहास पोहोचावा, या उद्देशाने या पुस्तकाची पहिली आवृत्ती प्रकाशित करण्यात आली होती. आतापर्यंत या पुस्तकाच्या सुमारे ९ हजारांहून अधिक प्रती कल्याण-डोंबिवलीसह पुणे, नाशिक, रत्नागिरी आणि गोवा येथील शाळांमध्ये विनामूल्य वितरित करण्यात आल्या आहेत.

या उपक्रमाचे संकल्पनाकार डॉ. योगेश जोशी यांनी ७ नोव्हेंबर २०२६ पर्यंत २५ हजार प्रती विनामूल्य वितरित करण्याचा संकल्प यावेळी जाहीर केला. पुस्तकामध्ये ‘वंदे मातरम्’चे रचनाकार बंकिमचंद्र चटर्जी यांचे चरित्र, गीताची निर्मिती, ‘आनंदमठ’ कादंबरीचे कथासूत्र आणि या गीतामुळे घडलेली क्रांती यांचा समावेश आहे. तसेच संपूर्ण ‘वंदे मातरम्’ आणि त्याचा अर्थ विद्यार्थ्यांना सहज समजेल अशा सोप्या भाषेत मांडण्यात आला आहे. या उपक्रमामुळे ‘वंदे मातरम्’च्या इतिहासाची ओळख नव्या पिढीपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचत असून विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना अधिक दृढ होत आहे.

‘वंद्य वंदे मातरम्’ पुस्तकाच्या प्रती अक्षरमंच प्रकाशनच्या कार्यालयात उपलब्ध आहेत. शैक्षणिक संस्था, ग्रंथालये आणि क्लासेस यांना प्रती हव्या असल्यास प्रतिनिधींनी ९७५७०७७६१४ किंवा ८७७९६४४९९२ या क्रमांकांवर संपर्क साधावा.

शासन सुस्त… कर्मचारी त्रस्त : संवाद हरवला, विश्वास डळमळला

शासन सुस्त… कर्मचारी त्रस्त : संवाद हरवला, विश्वास डळमळला

शासन सुस्त… कर्मचारी त्रस्त : संवाद हरवला, विश्वास डळमळलाशासन सुस्त… कर्मचारी त्रस्त : संवाद हरवला, विश्वास डळमळला

 

“लोकशाही केवळ सत्तेची रचना नसते; ती विश्वास, संवाद आणि उत्तरदायित्व यांचा जिवंत करार असतो.” प्रश्न केवळ संपाचा नाही; प्रश्न आहे—व्यवस्था ऐकते आहे का? लोकशाही व्यवस्थेची खरी ताकद तिच्या प्रतिसादक्षमतेत, संवेदनशीलतेत आणि जनतेच्या प्रश्नांना वेळेवर, न्याय्य व पारदर्शक उत्तर देण्याच्या क्षमतेत दडलेली असते. परंतु जेव्हा ही तिन्ही तत्त्वे एकाच वेळी कमकुवत होतात, तेव्हा केवळ प्रशासकीय अडथळे निर्माण होत नाहीत—तर संपूर्ण व्यवस्थेवरच विश्वासाचा प्रश्न उभा राहतो. २१ एप्रिलपासून सुरू झालेल्या बेमुदत संपाने हेच वास्तव ठळकपणे समोर आणले आहे. हा संप केवळ कर्मचाऱ्यांचा संघर्ष राहिलेला नाही; तो शासन-प्रशासनाच्या कार्यपद्धतीची, निर्णयक्षमतेची आणि उत्तरदायित्वाची उघडी परीक्षा ठरला आहे.

आजच्या परिस्थितीकडे पाहताना एक तीव्र प्रतिमा समोर येते—“कानात बोळे, डोळ्यावर पट्टी आणि मौनव्रत.” आंदोलनकर्त्यांचा आवाज स्पष्ट आहे, समस्या सर्वांसमोर उघड आहे, उपाययोजना शक्य आहेत—तरीही प्रतिसादाचा अभाव जाणवतो. अशा वेळी प्रश्न केवळ व्यवस्थेच्या कार्यक्षमतेचा राहत नाही; तो तिच्या संवेदनशीलतेवरही बोट ठेवतो. कोणताही बेमुदत संप हा अचानक घडणारा प्रसंग नसतो. तो दीर्घकाळ साचलेल्या नाराजीचा, अपूर्ण आश्वासनांचा आणि तुटलेल्या संवादाचा परिपाक असतो. वेतनवाढीच्या प्रलंबित मागण्या, सेवा अटींतील सुधारणांचा अभाव, कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेबाबतची उदासीनता—या सर्व घटकांनी एकत्र येऊन असंतोषाची पायाभरणी केली आहे. अनेकदा समित्या स्थापन होतात, बैठका घेतल्या जातात, आश्वासने दिली जातात; पण प्रत्यक्ष अंमलबजावणीत विलंब होतो किंवा ती अर्धवट राहते. परिणामी, विश्वास हळूहळू ढासळतो.

विश्वास हा कोणत्याही व्यवस्थेचा आधारस्तंभ असतो. जेव्हा तो डळमळीत होतो, तेव्हा केवळ प्रश्न निर्माण होत नाहीत—तर त्या प्रश्नांची तीव्रताही वाढते. काही ठिकाणी जाहीर केलेले भत्ते किंवा सुविधा प्रत्यक्षात कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचत नाहीत, निर्णय कागदोपत्रीच राहतात आणि संवाद औपचारिकतेपुरता मर्यादित राहतो—अशा अनुभवांमुळे असंतोषाला खतपाणी मिळते. संवाद तुटला की गैरसमज वाढतात, आणि गैरसमज वाढले की संघर्ष उग्र होतो—ही साखळी येथे स्पष्ट दिसते. शासन आणि प्रशासनाच्या भूमिकेकडे पाहिले असता, विलंब, उदासीनता आणि निर्णय टाळण्याची प्रवृत्ती ही ठळकपणे जाणवते. लोकशाही व्यवस्थेत शासन हे केवळ सत्ताधारी नसते, तर ते जनतेच्या अपेक्षांचे प्रतिनिधित्व करणारे असते. त्यामुळे समस्यांकडे दुर्लक्ष करणे किंवा त्यांना विलंब लावणे म्हणजे लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वांनाच धक्का देणे होय. वेळेवर हस्तक्षेप झाला असता, तर परिस्थिती इतकी चिघळली नसती—ही भावना व्यापक स्तरावर उमटताना दिसते.

तथापि, या चित्राचा दुसरा पैलूही लक्षात घेणे आवश्यक आहे. शासनावर आर्थिक मर्यादा, धोरणात्मक प्राधान्यक्रम, विविध विभागांतील समन्वयाची गुंतागुंत आणि व्यापक प्रशासनिक जबाबदाऱ्या यांचा ताण असतो. प्रत्येक मागणी तात्काळ पूर्ण करणे व्यवहार्य नसते. परंतु याचा अर्थ असा होत नाही की संवाद टाळला जावा किंवा निर्णय अनिश्चिततेत ठेवले जावेत. उलट, अशा परिस्थितीत स्पष्टता, प्रामाणिक संवाद आणि वेळबद्ध कृती अधिक आवश्यक ठरते. या संपाचे परिणाम समाजाच्या प्रत्येक स्तरावर उमटत आहेत. सार्वजनिक सेवा विस्कळीत झाल्यामुळे सामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर त्याचा थेट परिणाम होत आहे. आरोग्यसेवा उशिरा मिळणे, शैक्षणिक प्रक्रियेत अडथळे येणे, वाहतूक व्यवस्थेत गोंधळ निर्माण होणे—या समस्या केवळ तात्पुरत्या अडचणी नाहीत; त्या व्यवस्थेतील समन्वयाच्या अभावाचे निदर्शक आहेत. एखाद्या रुग्णाला वेळेवर उपचार न मिळणे किंवा विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडणे या घटना समाजाच्या संवेदनशीलतेला प्रश्न विचारतात.

आर्थिकदृष्ट्या देखील या परिस्थितीचे परिणाम गंभीर आहेत. उत्पादन प्रक्रियेत अडथळे येणे, सेवा क्षेत्र मंदावणे आणि बाजारपेठेतील अनिश्चितता वाढणे—या गोष्टी अर्थचक्रावर ताण निर्माण करतात. दीर्घकाळ चालणारा संप विकासाच्या गतीला अडथळा निर्माण करतो आणि गुंतवणुकीवरील विश्वास कमी करतो. शेवटी याचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनमानावर होतो. या संपूर्ण परिस्थितीच्या केंद्रस्थानी एकच प्रश्न आहे—संवाद का तुटला? लोकशाही व्यवस्थेचा आत्मा संवादात असतो. संवादामुळे मतभेद दूर होतात, विश्वास निर्माण होतो आणि समस्यांना दिशा मिळते. परंतु जेव्हा संवाद थांबतो, तेव्हा संघर्ष सुरू होतो. आंदोलनकर्त्यांनी संवादासाठी प्रयत्न केले, परंतु अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही, ही भावना वाढत गेली. दुसरीकडे, शासनानेही संवादासाठी अपेक्षित पुढाकार घेतला नाही. या परस्पर अंतरामुळे परिस्थिती अधिकच गुंतागुंतीची बनली.

माध्यमांची भूमिका येथे महत्त्वाची ठरते. माध्यमे ही समाज आणि शासन यांच्यातील दुवा असतात. काही माध्यमांनी या प्रश्नाचे सखोल विश्लेषण करून समाजाला वास्तवाची जाणीव करून दिली, तर काही ठिकाणी वरवरचे चित्रणही दिसून आले. अशा वेळी निष्पक्ष आणि जबाबदार पत्रकारिता ही लोकशाहीसाठी अत्यावश्यक ठरते. कामगार संघटनांची भूमिका देखील तितकीच महत्त्वाची आहे. त्यांनी कामगारांच्या मागण्यांना दिशा देणे आणि संघर्षाला संयमित व शिस्तबद्ध स्वरूप देणे आवश्यक असते. एकजूट ही ताकद असली तरी विवेक आणि समन्वय यांची जोड आवश्यक असते. संघर्षाचा उद्देश केवळ दबाव निर्माण करणे नसून, तोडगा काढणे हा असायला हवा.

या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे संवादाची पुनर्स्थापना. शासनाने पुढाकार घेऊन पारदर्शक, प्रामाणिक आणि वेळबद्ध चर्चेची प्रक्रिया सुरू करणे आवश्यक आहे. विश्वास पुनर्स्थापित करणे ही प्राथमिक गरज आहे. दिलेली आश्वासने वेळेत पूर्ण करणे, मध्यस्थीची प्रभावी यंत्रणा उभारणे आणि दीर्घकालीन धोरणात्मक सुधारणा करणे—या गोष्टी अपरिहार्य आहेत. तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून संवाद आणि अंमलबजावणी प्रक्रिया अधिक वेगवान करता येईल. प्रशासनिक कार्यपद्धती अधिक पारदर्शक आणि उत्तरदायी बनवणे आवश्यक आहे. केवळ तात्पुरते उपाय न करता मूलभूत सुधारणा केल्यास भविष्यात अशा परिस्थितीची पुनरावृत्ती टाळता येईल.

शेवटी, या संपूर्ण घटनेतून एक स्पष्ट संदेश मिळतो—लोकशाही व्यवस्था केवळ कायदे आणि यंत्रणा यांवर टिकत नाही; ती विश्वासावर उभी असते. जेव्हा संवाद तुटतो, तेव्हा विश्वास ढासळतो आणि व्यवस्था कमकुवत होते. हा संप एक इशारा आहे—व्यवस्थेने स्वतःकडे पाहण्याची आणि सुधारण्याची वेळ आलेली आहे. जर शासनाने संवेदनशीलतेने, जबाबदारीने आणि वेळेवर कृती केली, तर हा संघर्ष परिवर्तनाची संधी ठरू शकतो. अन्यथा, अशा संघर्षांची पुनरावृत्ती अपरिहार्य ठरेल. “सत्ता टिकवण्यासाठी अधिकार पुरेसा असतो; पण विश्वास टिकवण्यासाठी संवेदनशीलता, संवाद आणि वेळेवर कृती—ही तिन्ही अपरिहार्य असतात.”

 

*©गुरुदत्त दिनकर वाकदेकर, मुंबई*

दिनांक: २४/०४/२०२६

भडगावात फुले-आंबेडकर संयुक्त जयंतीनिमित्त भिमगीतांचा कार्यक्रम

भडगावात फुले-आंबेडकर संयुक्त जयंतीनिमित्त भिमगीतांचा कार्यक्रम

भडगावात फुले-आंबेडकर संयुक्त जयंतीनिमित्त भिमगीतांचा कार्यक्रमभडगावात फुले-आंबेडकर संयुक्त जयंतीनिमित्त भिमगीतांचा कार्यक्रम

भडगाव प्रतिनिधी :-

महात्मा ज्योतीबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त भडगाव येथे दि. २६ एप्रिल रोजी रात्री ८ वाजता शेतकरी संघ प्रांगणात भिमगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमात सुप्रसिद्ध गायक राजू बागुल (मुंबई) व गायिका वैशाली किरण (नागपूर) सादरीकरण करणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार किशोर आप्पा पाटील राहणार असून उद्घाटन लखिचंद भाऊ पाटील यांच्या हस्ते होणार आहे.

कार्यक्रमास नगराध्यक्ष रेखाताई मालचे, उपनगराध्यक्ष राजेंद्र पाटील, नगरसेवक प्रवीण ब्राम्हणे (पाचोरा), नानासाहेब प्रताप हरी पाटील, प्रभाकर जाधव, उपविभागीय अधिकारी भुषण अहिरे (पाचोरा), उपविभागीय पोलिस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड (चाळीसगाव विभाग), तहसीलदार शीतल सोलाट, पोलिस निरीक्षक प्रताप एकशिंगे, मुख्याधिकारी मंगेश देवरे, गटविकास अधिकारी के. बी. अंजने, चेअरमन राजेंद्र बापू परदेशी, तसेच एस. डी. खेडकर उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक ॲड. रविंद्र ब्राम्हणे व गणेश रावळ यांनी केले आहे.

एरंडोल पोलीस ठाण्यात आमदार अमोल पाटील यांचा ४ तास ठिय्या; खंडणीखोर अधिकाऱ्याविरुद्ध अखेर गुन्हा दाखल

एरंडोल पोलीस ठाण्यात आमदार अमोल पाटील यांचा ४ तास ठिय्या; खंडणीखोर अधिकाऱ्याविरुद्ध अखेर गुन्हा दाखल

एरंडोल पोलीस ठाण्यात आमदार अमोल पाटील यांचा ४ तास ठिय्या; खंडणीखोर अधिकाऱ्याविरुद्ध अखेर गुन्हा दाखलएरंडोल पोलीस ठाण्यात आमदार अमोल पाटील यांचा ४ तास ठिय्या; खंडणीखोर अधिकाऱ्याविरुद्ध अखेर गुन्हा दाखल

एरंडोल प्रतिनिधी :-

सामान्य नागरिकांना धमकावून खंडणी उकळणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात आता कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पारोळा मतदारसंघाचे शिवसेना आमदार अमोल पाटील यांनी दिला. एरंडोल येथील चहा विक्रेत्याकडून १० हजार रुपयांची खंडणी उकळल्याच्या प्रकरणात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्याविरुद्ध अखेर एरंडोल पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, एरंडोल शहरातील मढी परिसरात चहा विक्री करणारे गजानन माधवराव महाजन यांच्या दुकानावर दोन दिवसांपूर्वी अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी किशोर हिम्मतराव बाविस्कर हे चार साथीदारांसह आले होते. दुकानात कोणतेही प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ आढळले नसतानाही “तुझ्यावर गुटख्याचा गुन्हा दाखल करतो” अशी धमकी देत त्यांनी १० हजार रुपयांची मागणी केली. भीतीपोटी महाजन यांनी संबंधित रक्कम दिल्याचे समोर आले आहे.

याच अधिकाऱ्याने एरंडोल परिसरातील इतर लहान व्यावसायिकांवरही धाडीच्या नावाखाली दबाव टाकत सुमारे २० हजार रुपयांची खंडणी उकळल्याची माहिती पुढे आली आहे. ही बाब आमदार अमोल पाटील यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तातडीने कारवाईचा पवित्रा घेतला.

मंगळवारी सायंकाळी सुमारे ५ वाजता आमदार पाटील कार्यकर्त्यांसह एरंडोल पोलीस ठाण्यात दाखल झाले. त्यांनी संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध तत्काळ गुन्हा नोंदवण्याची मागणी केली. मात्र, पोलिसांकडून सुरुवातीला टाळाटाळ होत असल्याचा आरोप करत आमदारांनी पोलीस ठाण्याच्या पायऱ्यांवरच ठिय्या आंदोलन सुरू केले. “जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत हलणार नाही,” अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली.

या दरम्यान मोठ्या संख्येने शिवसैनिक पोलीस ठाण्यात जमा झाल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. अखेर वाढत्या दबावामुळे पोलिसांनी नमते घेत रात्री उशिरा किशोर बाविस्कर व त्यांच्या चार साथीदारांविरुद्ध खंडणी उकळल्याचा गुन्हा दाखल केला.

या प्रकरणी गजानन महाजन यांनी अधिकृत फिर्याद दिली असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर पवार करत आहेत. या कारवाईमुळे परिसरातील भ्रष्ट अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, आमदार पाटील यांच्या आक्रमक भूमिकेचे नागरिकांकडून स्वागत होत आहे.

पालू गावाचे भूषण काका गुरव यांना पोलीस उपनिरीक्षक पदावर बढती

पालू गावाचे भूषण काका गुरव यांना पोलीस उपनिरीक्षक पदावर बढती

पालू गावाचे भूषण काका गुरव यांना पोलीस उपनिरीक्षक पदावर बढतीपालू गावाचे भूषण काका गुरव यांना पोलीस उपनिरीक्षक पदावर बढती

पालू (गुरुदत्त वाकदेकर): पालू गावाचे मान्यवर व अत्यंत प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व काका गुरव यांना पोलीस विभागात पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) या जबाबदारीच्या पदावर बढती मिळाल्याने गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. सुमारे दोन महिन्यांपूर्वी अर्हता पदोन्नती प्राप्त झाल्याने त्यांच्या या यशाचा गावकऱ्यांकडून उत्साहाने गौरव केला जात आहे.

काका गुरव यांनी सन २०१३ मध्ये पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा उत्तीर्ण केली होती. त्यानंतर ‘मॅट कोर्ट’ प्रकरण प्रलंबित असल्यामुळे पदोन्नती प्रक्रियेत विलंब झाला होता. सातत्यपूर्ण प्रयत्न आणि संयमाच्या जोरावर त्यांनी सर्व अडथळ्यांवर मात करत अखेर हे मानाचे पद प्राप्त केले आहे. सध्या ते मंत्रालयात कार्यरत असून आपल्या कर्तव्यदक्षतेमुळे त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली आहे.

अथक परिश्रम, प्रामाणिकपणा आणि जिद्दीच्या बळावर मिळवलेले हे यश केवळ वैयक्तिक मर्यादेत न राहता संपूर्ण पालू गावासाठी अभिमानाची आणि प्रेरणादायी घटना ठरली आहे. त्यांच्या यशामुळे गावातील तरुणांमध्ये नवी उमेद आणि स्पर्धात्मकतेची भावना निर्माण होत असल्याचे चित्र आहे.

काका गुरव यांनी भविष्यातही आपल्या कर्तृत्वाने उंच भरारी घ्यावी, समाजसेवा अधिक जोमाने करावी आणि पालू गावाचे नाव उज्ज्वल करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी उत्तम आरोग्य, सातत्यपूर्ण यश आणि अधिकाधिक प्रगतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.

नाशिकमध्ये राज्यस्तरीय कलावंत पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न

नाशिकमध्ये राज्यस्तरीय कलावंत पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्ननाशिकमध्ये राज्यस्तरीय कलावंत पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न

नाशिक (गुरुदत्त वाकदेकर): कलावंत विचार मंच, कमल फिल्म प्रोडक्शन आणि कमल म्युझिक मराठी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय कलावंत पुरस्कार वितरण सोहळा अध्यक्ष सुनील मोंढे यांच्या स्वागताध्यक्षतेखाली उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

पं. सा. नाट्यमंदिर, नाशिक येथे रविवार दिनांक १८ एप्रिल २०२६ रोजी झालेल्या या सोहळ्यास ज्येष्ठ साहित्यिक सुभाषजी सोनवणे, अभिनेत्री दिपाली कुलकर्णी, प्रा. सोमनाथ मुठाळ आणि कवयित्री सुनीता वाळुंज यांची प्रमुख उपस्थिती लाभली. विविध कला क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कलाकारांचा यावेळी गौरव करण्यात आला.

पुरस्कारप्राप्त मान्यवरांमध्ये आंतरराष्ट्रीय बाल कवयित्री अजया मुळीक (महाराष्ट्र विद्यालय, पुणे), अभिनेत्री राणी जाधव (पुणे), सुमती टापसे (नाशिक), अजिंक्य सोनवणे (अहिल्यानगर), प्रा. छाया बोरकर (गोंदिया), अरुण शेलार (नाशिक), वाल्मिक मेश्राम (भंडारा), तन्वी भदाणे (धुळे), शिवाजी लोमंटे (नांदेड), अहमद शेख (हिंगोली), देवश्री बावनथडे (नागपूर), डॉ. सुकीर्ती शर्मा (मुंबई) यांचा समावेश होता. तसेच ज्ञानेश्वर थोटे (नेवासा), शोभा धामस्कर (गोवा), ज्ञानदेव शिंदे (संगमनेर), राजेश्वरी सावळे (नाशिक), प्रमोद पंडीत (लोणी), दत्तू दाणी (नाशिक), संजय पाटील (धुळे), अंकुश मांडेकर (पुणे), अंजली गादे (लातूर), धनश्री वाघ (अहिल्यानगर), महेश लोखंडे (श्रीरामपूर), सुभांगी मेहेत्रे (नाशिक), दिपक गरुड (बीड), नंदकुमार पाटील (जळगाव), अमित काकडे (मुंबई) आदी कलावंतांनाही सन्मानित करण्यात आले.

प्रमुख अतिथी व्याख्याते सुभाषजी सोनवणे यांनी आपल्या मनोगतात कलावंत विचार मंच संस्था मागील दहा वर्षांपासून तळागाळातील कलावंतांसाठी सातत्याने कार्यरत असल्याचे नमूद केले. विविध क्षेत्रांतील गुणवंत कलाकारांची निवड करून त्यांचा गौरव करण्याची परंपरा संस्थेने जपली असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यभरातून प्रस्ताव मागवून त्यातून दर्जेदार कलावंतांची निवड करण्यात येते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश पाटील लिंबे वडगावकर यांनी केले, तर प्रा. सोमनाथ मुठाळ यांनी आभार मानले. या यशस्वी आयोजनासाठी सुप्रिया गवळे, आनंद साळवे, रज्जाक शेख आदींनी विशेष परिश्रम घेतले. विविध कला क्षेत्रांतील प्रतिभावंतांचा गौरव करणारा हा सोहळा प्रेरणादायी आणि उत्साहवर्धक ठरला.

भडगाव तालुक्यात तलाठी व मंडळ अधिकारी बेमुदत संपावर महसूल कामकाज ठप्प होण्याची चिन्हे

भडगाव तालुक्यात तलाठी व मंडळ अधिकारी बेमुदत संपावर

भडगाव तालुक्यात तलाठी व मंडळ अधिकारी बेमुदत संपावर

महसूल कामकाज ठप्प होण्याची चिन्हेभडगाव तालुक्यात तलाठी व मंडळ अधिकारी बेमुदत संपावर

महसूल कामकाज ठप्प होण्याची चिन्हे

भडगाव प्रतिनिधी :-

राज्यातील विविध प्रलंबित मागण्यांसाठी पुकारण्यात आलेल्या राज्यव्यापी बेमुदत संपात भडगाव तालुक्यातील तलाठी व मंडळ अधिकारी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला आहे. महाराष्ट्र राज्य तलाठी संघ च्या निर्णयानुसार दि. २१ एप्रिल २०२६ पासून तालुक्यातील सर्व ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) व मंडळ अधिकारी बेमुदत संपावर गेले आहेत.

या संपामागे वेतनवाढ, सेवा अटींमध्ये सुधारणा तसेच इतर प्रलंबित प्रशासकीय मागण्यांचा समावेश असल्याची माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. संपामुळे महसूल विभागातील दैनंदिन कामकाजावर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

विशेषतः सातबारा उतारे, फेरफार नोंदी, उत्पन्न दाखले, जात प्रमाणपत्रे आदी महत्त्वाच्या सेवा ठप्प होण्याची भीती नागरिकांमध्ये व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नागरिकांना विविध शासकीय कामांसाठी अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

दरम्यान, प्रशासनाच्या वतीने अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आलेली नसून, परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असल्याचे समजते. नागरिकांनी अत्यावश्यक कागदपत्रांसाठी पर्यायी व्यवस्था करण्याचे आवाहनही करण्यात येत आहे.

संप किती काळ चालणार याबाबत अनिश्चितता असून, शासन व कर्मचारी संघटनांमध्ये लवकरात लवकर तोडगा निघावा, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

या संपात भडगाव तालुका ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी संघाचे अध्यक्ष अविनाश जंजाळे, सचिव संजय सोनवणे तसेच प्रशांत कुंभारे, योगेश पाटील, एम. जे. खाटीक, विवेक महाजन, दिपक पाटील, शीतल राजपूत, नीता अकोटकर, वैशाली वाघ, प्रियांका शिंदे, गायत्री पाटील, अनिता सुतार, महसूल सेवक किरण मोरे व कविता सोनवणे आदी सहभागी झाले आहेत.

Don`t copy text!