गिरणा नदीत अज्ञात इसमाचा मृतदेह; पोलिसांचा तपास सुरू, ओळख पटविण्याचे प्रयत्न वेगात
भडगाव ता.प्रतिनिधी : -आमीन पिंजारी
तालुक्यातील कजगाव परिसरात असलेल्या गिरणा नदी पात्रात मंगळवार (दि. ५ मे) रोजी दुपारी सुमारे ३५ वर्षे वयोगटातील एका अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीती व कुतूहलाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारच्या सुमारास काही नागरिक नदीकाठी गेले असता त्यांना पाण्यात तरंगत असलेला मृतदेह दिसून आला. या घटनेची गंभीरता लक्षात घेऊन नागरिकांनी तत्काळ गोंडगाव व कोळगाव येथील पोलीस पाटलांना माहिती दिली. त्यानंतर भडगाव पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्यात आला.
माहिती मिळताच भडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार नरेंद्र विसपुते तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्या सोबत पोलीस पथकाने घटनास्थळी पाहणी करून प्राथमिक तपास सुरू केला. सावदा परिसरातील गिरणा नदी पुलाखाली पाण्यात बुडालेल्या अवस्थेत सदर मृतदेह आढळून आला.
पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह बाहेर काढला व पुढील तपासासाठी आवश्यक फॉरेन्सिक कार्यवाही करण्यात आली. मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसून, त्याच्या अंगावर कोणतेही ओळखपत्र अथवा ठोस पुरावे आढळून आले नाहीत, अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे.
दरम्यान, मृतदेह भडगाव येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून, मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे. पाण्यात बुडाल्यामुळे मृत्यू झाला की इतर काही कारण आहे, याबाबत पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे.
या प्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद (A.D. No. 38/2026) बीएनएसएस 2023 च्या कलम 194 अन्वये करण्यात आली आहे. मृत्यूची अचूक वेळ अद्याप निश्चित झालेली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
सदर घटनेचा तपास पोलीस हवालदार नरेंद्र विसपुते हे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप एकशिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत. तसेच, परिसरातील हरवलेल्या व्यक्तींची माहिती, सीसीटीव्ही फुटेज, तसेच स्थानिकांकडून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, सदर व्यक्तीबाबत कोणतीही माहिती असल्यास तात्काळ भडगाव पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा (मो. ९७६६६२७१४७).
घटनास्थळी पीएसआय सुशील सोनवणे, कोळगाव दूरक्षेत्राचे पोलीस हवालदार मुकुंद परदेशी, तसेच गोंडगाव व कोळगाव येथील पोलीस पाटील आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.





