भडगाव नगरपरिषद निवडणूक प्रभाग क्रमांक ३ वर शिवसेनेचा झेंडा, दोन्ही उमेदवार दणदणीत विजयी.!!!
भडगाव प्रतिनिधी :-
भडगाव नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक ३ मधून शिवसेनेने निर्विवाद वर्चस्व सिद्ध करत दोन्ही जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे. या प्रभागातून शिवसेनेच्या मिर्झा अंजुम परविन हकीमबेग यांनी १७८५ मतांनी स्पष्ट विजय मिळवला, तर सय्यद इमरान अली शहादतअली यांनी १६६८ मतांनी प्रतिस्पर्ध्यांचा पराभव केला.
या निकालामुळे संपूर्ण प्रभागात शिवसेना कार्यकर्ते व समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. निकाल जाहीर होताच ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत तसेच एकमेकांना मिठाई भरवून आनंद साजरा करण्यात आला. प्रभागातील नागरिकांनीही विजयी उमेदवारांचे अभिनंदन करत शुभेच्छांचा वर्षाव केला.
विजयानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना दोन्ही नवनिर्वाचित नगरसेवकांनी मतदारांचे आभार मानले. प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, आरोग्य सुविधा तसेच इतर मूलभूत प्रश्नांना प्राधान्य देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
या विजयामुळे भडगाव नगरपरिषदेत शिवसेनेची ताकद अधिक मजबूत झाली असून, आगामी काळात शहराच्या विकासाच्या दृष्टीने सकारात्मक व लोकाभिमुख निर्णय घेतले जातील, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.
