लोकसेवा क्लिनिकच्या मोफत नेत्र तपासणी शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
नाचणवेल, ता. कन्नड (प्रतिनिधी):
आमदाबाद फाटा, नाचणवेल येथील लोकसेवा क्लिनिक येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत नेत्र तपासणी शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ग्रामीण भागातील नागरिकांना तज्ज्ञ नेत्रसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित या शिबिरात एकूण २५ रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली.
प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ डॉ. इमरान हुसेन शेख यांनी रुग्णांची सखोल तपासणी करून आवश्यक मार्गदर्शन केले. तपासणीदरम्यान ५ रुग्णांमध्ये मोतीबिंदूची लक्षणे आढळून आली, तर अनेक रुग्णांना जवळचा किंवा दूरचा दृष्टीदोष असल्याचे निदर्शनास आले. संबंधित रुग्णांना आवश्यक त्या क्रमांकाचे चष्मे तसेच पुढील उपचारांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
शिबिरात सहभागी झालेल्या नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करत नियमित नेत्र तपासणीचे महत्त्व अधोरेखित केले. ग्रामीण भागात तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत आरोग्यसेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले.
या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. इमरान हुसेन शेख यांनी रुग्णांना मार्गदर्शन केले, तर डॉ. बनेखा पठाण आणि जावेदभाई यांनी नियोजन व व्यवस्थापनात मोलाचे सहकार्य केले.





