अपात्र ‘लाडक्या बहिणीं’ना पुन्हा ई-केवायसीची संधी,? पात्र महिलांचा लाभ कायम

अपात्र ‘लाडक्या बहिणीं’ना पुन्हा ई-केवायसीची संधी,? पात्र महिलांचा लाभ कायम

मुंबई प्रतिनिधी :-

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न केलेल्या महिलांना पुन्हा एकदा संधी देण्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. त्यामुळे विविध कारणांमुळे लाभापासून वंचित राहिलेल्या अनेक महिलांना दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, योजनेचे सर्व निकष पूर्ण करणाऱ्या महिलांना योजनेचा लाभ नियमितपणे मिळत राहील. सध्या राज्यातील सुमारे १ कोटी ७० लाख महिलांनी पात्रतेचे निकष पूर्ण केले असून त्यांना योजनेचा लाभ दिला जात आहे. लाभार्थी संख्येच्या दृष्टीने ही योजना देशातील सर्वात मोठ्या योजनांपैकी एक असल्याचेही त्यांनी नमूद केले.

योजनेच्या अंमलबजावणीदरम्यान करण्यात आलेल्या पडताळणीत सुमारे ८१ लाख महिला विविध कारणांमुळे अपात्र ठरल्याचे समोर आले आहे. मात्र, या महिलांना यापूर्वी मिळालेल्या आर्थिक लाभाची रक्कम परत घेण्यात येणार नसल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. अपात्र महिलांना एकवेळ माफी देण्याचा निर्णय सरकारने घेतल्याचे त्यांनी जाहीर केले.

दुसरीकडे, ही योजना केवळ महिलांसाठी असतानाही काही पुरुषांनी लाभ घेतल्याचे आढळून आले आहे. पडताळणीत सुमारे १४ हजार पुरुष लाभार्थी असल्याचे निष्पन्न झाले असून अशा प्रकरणांमध्ये संबंधितांकडून लाभाची रक्कम वसूल केली जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

ई-केवायसीची संधी पुन्हा उपलब्ध झाल्यास तांत्रिक अडचणी, कागदपत्रांची अपूर्णता किंवा इतर कारणांमुळे लाभापासून वंचित राहिलेल्या महिलांना दिलासा मिळू शकतो. याबाबतचा अंतिम निर्णय व अधिकृत मार्गदर्शक सूचना शासनाकडून जाहीर होण्याची प्रतीक्षा आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!