मानवी जीवितास अपायकारक बनावट देशी दारू टॅंगो पंच कारखान्यावर शिंदखेडा पोलिसांचा छापा; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त
धुळे प्रतिनिधी :-
धुळे जिल्हा पोलिसांनी बनावट देशी दारू निर्मितीविरोधात मोठी कारवाई करत शिंदखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाम्हणे एमआयडीसी परिसरातील अवैध कारखान्यावर छापा टाकून बनावट देशी दारू तयार करणारा कारखाना उद्ध्वस्त केला. या कारवाईत लाखो रुपयांचे साहित्य व तयार दारू जप्त करण्यात आली.
पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली ३१ जुलै २०२६ रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर भामरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. बाम्हणे एमआयडीसीतील प्लॉट क्रमांक ई-५३ येथे सुरू असलेल्या अवैध दारू निर्मिती केंद्रावर पोलिसांनी धाड टाकली.
कारवाईदरम्यान चंद्रकांत धुडकू बिरारी (वय ३५, रा. माळी गल्ली, सोनगीर, ता. जि. धुळे) याला ताब्यात घेण्यात आले. घटनास्थळावरून दारू निर्मितीसाठी वापरली जाणारी लेबलिंग मशीन, पॅकिंग मशीन, प्लास्टिकच्या बाटल्या, रंग, मिक्सिंग मशीन तसेच मोठ्या प्रमाणावर बनावट देशी दारूचा साठा जप्त करण्यात आला.
पोलिसांनी जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये दारू निर्मितीची यंत्रसामग्री, विविध साहित्य आणि मोठ्या प्रमाणावर तयार बनावट देशी दारूचा समावेश असून, संपूर्ण मुद्देमालाची किंमत लाखो रुपयांच्या घरात असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. या प्रकरणी शिंदखेडा पोलीस ठाण्यात पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.





