एच. जे. थीम कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स, जळगाव राष्ट्रीय सेवा योजना विभागाचा ‘मिशन 100 ट्रीज’ उपक्रम; शंभर वृक्षांचे वृक्षारोपण
जावेद शेख
जळगाव पर्यावरण संवर्धन, जैवविविधतेचे संरक्षण आणि भावी पिढ्यांसाठी हरित वारसा निर्माण करण्याच्या उद्देशाने इकरा एज्युकेशन सोसायटी संचलित एच. जे. थीम कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स, जळगाव राष्ट्रीय सेवा योजना विभागाचा ‘मिशन 100 ट्रीज’ या विशेष उपक्रमांतर्गत भव्य वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात विविध प्रजातींच्या वृक्षांची लागवड करून पर्यावरण संवर्धनाचा दृढ संकल्प करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इकरा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. अब्दुल करीम सालार उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव एजाज अहमद मलिक यांची उपस्थिती लाभली. तसेच इकरा एज्युकेशन सोसायटीचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांनीही कार्यक्रमात सहभाग नोंदवून वृक्षारोपण मोहिमेस प्रोत्साहन दिले.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वकार शेख यांनी वृक्षांचे पर्यावरणीय, सामाजिक व आर्थिक महत्त्व अधोरेखित करताना प्रत्येक नागरिकाने दरवर्षी किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन केले.
राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. इरफान शेख यांनी ‘मिशन 100 ट्रीज’ या उपक्रमामागील उद्दिष्ट स्पष्ट करताना वृक्षारोपणासोबतच वृक्षसंवर्धनालाही तितकेच महत्त्व असल्याचे सांगितले. “फक्त वृक्ष लावणे नव्हे, तर त्यांचे संगोपन करून त्यांना मोठे करणे हीच खरी पर्यावरण सेवा आहे,” असे त्यांनी नमूद केले.
या प्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेचे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ. हाफिज शेख, महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. फिरदौस शेख यांनीही पर्यावरण संरक्षणासाठी युवकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगून विद्यार्थ्यांना अधिकाधिक वृक्ष लागवडीसाठी प्रेरित केले.
कार्यक्रमात इकरा एज्युकेशन सोसायटीचे सर्व पदाधिकारी, महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत विविध वृक्षांची लागवड केली. महाविद्यालय परिसर हिरवागार करण्याच्या उद्देशाने शंभर वृक्ष लावण्याचा संकल्प पूर्ण करण्यात आला.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांनी वृक्षांचे नियमित संगोपन, पाणीपुरवठा आणि संरक्षण करण्याची सामूहिक शपथ घेतली. पर्यावरण संवर्धनासाठी महाविद्यालय सातत्याने अशा उपक्रमांचे आयोजन करत असून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक उत्तरदायित्व आणि निसर्गप्रेमाची भावना विकसित करण्यासाठी ही मोहीम निश्चितच प्रेरणादायी ठरणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.





