पाचोरा उर्दू केंद्रप्रमुखपदी शेख जावेद रहीम यांची निवड; बार कौन्सिलतर्फे सत्कार
पाचोरा प्रतिनिधी :-
कृतीच्या माध्यमातून शिक्षण देणारे आदर्श शिक्षक शेख जावेद रहीम यांची पाचोरा उर्दू केंद्रप्रमुखपदी निवड झाली आहे.
महाराष्ट्र राज्यात उर्दू व मराठी माध्यमांच्या केंद्रप्रमुखांची अनेक पदे दीर्घकाळापासून रिक्त होती. ही पदे भरण्यासाठी केंद्रप्रमुख समन्वय समितीकडून शिक्षण विभागाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू होता. अखेर या रिक्त जागांसाठी राज्यभरात फेब्रुवारी महिन्यात मर्यादित स्पर्धा परीक्षा आयोजित करण्यात आली होती.
जळगाव जिल्ह्यात उर्दू केंद्रप्रमुखांच्या सहा जागा रिक्त होत्या, ज्यामध्ये पाचोरा उर्दू केंद्राचाही समावेश होता. पाचोरा तालुक्यातील उर्दू केंद्रप्रमुखपद हे तब्बल १० वर्षांपासून रिक्त असल्याने इतर शिक्षकांवर याचा अतिरिक्त (प्रभारी) भार देण्यात येत होता. आता पाचोरा उर्दू केंद्राला पूर्णवेळ आणि अधिकृत केंद्रप्रमुख मिळाल्याने परिसरातील शैक्षणिक वर्तुळात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
या निवडीबद्दल पाचोरा बार कौन्सिलचे अध्यक्ष अॅड. पी. बी. पाटील यांच्या हस्ते शेख जावेद रहीम यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या वेळी विधी सेवा समितीचे सदस्य अॅड. स्वप्निल मोरे, शेख रहीम भाई मिया, शाहिद रहीम, अफरोज रहीम आणि सूफीयान रंगरेज यांसारखे अनेक मान्यवर उपस्थित होते.
“स्पर्धा परीक्षेद्वारे मला ही जबाबदारी मिळाली आहे. या पदाच्या माध्यमातून मी पूर्ण न्याय देण्याचा प्रयत्न करेन. अल्पसंख्याक विद्यार्थ्यांचे कल्याण, त्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे, त्यांच्यात स्पर्धात्मक दृष्टिकोन रुजवणे आणि शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी मी सदैव कटिबद्ध राहीन.”





