₹5.11 कोटींच्या जलजीवन मिशन योजनेत कथित अनियमितता; ग्रामपंचायत सदस्यांची कारवाईची मागणी, उपोषणाचा इशारा
भडगाव प्रतिनिधी :-
भडगाव तालुक्यातील कजगाव येथे जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या ₹5 कोटी 11 लाख 98 हजार खर्चाच्या पाणीपुरवठा योजनेत कथित निकृष्ट दर्जाची व अपूर्ण कामे झाल्याचा आरोप करत ग्रामपंचायत सदस्य पुंडलिक मधुकर सोनवणे यांनी जिल्हाधिकारी, जळगाव यांच्याकडे सविस्तर निवेदन सादर केले आहे. दोषी ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी करत, १५ दिवसांत ठोस निर्णय न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
निवेदनानुसार, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत मंजूर झालेल्या या योजनेचा लाभ सुमारे १५,१३० नागरिकांना मिळणार असून, यासाठी ₹5.11 कोटींचा सार्वजनिक निधी खर्च करण्यात येत आहे. मात्र, प्रत्यक्षात अनेक कामे निकृष्ट दर्जाची, अपूर्ण व तांत्रिक मंजुरीच्या विरोधात झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी यापूर्वी ४ मार्च २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे लेखी तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर २४ जून २०२६ रोजी संयुक्त चौकशी करण्यात आली. चौकशी अहवालात विविध त्रुटींची नोंद असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे.
सोनवणे यांच्या म्हणण्यानुसार, सावदा–गिरणा नदीपात्रातील पाइपलाइन वाहून गेली, पारोळा रोडलगत टाकलेली पाइपलाइन विस्कळीत अवस्थेत आहे, नवीन जॅकवेल अपेक्षित खोलीपर्यंत नसून पंपगृहाचे बांधकामही अपूर्ण आहे. या सर्व बाबींची छायाचित्रे पुरावा म्हणून प्रशासनाकडे सादर करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.
तसेच चौकशी अहवालात त्रुटींची नोंद असूनही संबंधित ठेकेदार, अभियंते किंवा जबाबदार अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्यात आलेली नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. या प्रकरणाची वरिष्ठ स्तरावर स्वतंत्र पुनर्चौकशी करून दोषींवर प्रशासकीय, आर्थिक व कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
दरम्यान, या निवेदनावर १५ दिवसांच्या आत समाधानकारक कारवाई न झाल्यास भारतीय संविधानाने दिलेल्या शांततापूर्ण आंदोलनाच्या अधिकारानुसार जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे बेमुदत उपोषण करण्यात येईल, अशी पूर्वसूचना देण्यात आली आहे.





