मैत्रीचा विश्वासघात! आठ वर्षांच्या मित्राचाच गळा आवळून खून; तापी नदीत फेकला मृतदेह, धुळे एलसीबीने ४ दिवसांत उकलला थरार
धुळे जिल्हा प्रतिनिधी :-फहीम शाह
धुळे जिल्ह्यात मैत्रीच्या नात्यालाच काळिमा फासणारी आणि अंगावर काटा आणणारी घटना उघडकीस आली आहे. तब्बल आठ वर्षांच्या जिवलग मित्राचा ऊसनवारीच्या पैशांच्या वादातून गळा आवळून निर्घृण खून करण्यात आला. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह सावळदे येथील तापी नदीवरील पुलावरून नदीत फेकण्यात आला. मात्र स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) अचूक माहिती, तांत्रिक तपास आणि कौशल्यपूर्ण चौकशीमुळे हा थरारक खून उघडकीस आला असून मुख्य आरोपीसह त्याच्या अन्य तीन साथीदारांचा सहभाग समोर आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १४ जुलै २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार पवन गवळी यांना जुने धुळे येथील गणेश पाटील ऊर्फ भोला याने गंभीर गुन्हा केल्याची गोपनीय माहिती मिळाली. ही माहिती तात्काळ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना देण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पवन गवळी, अमोल पाटील आणि सुनिल पाटील यांच्या पथकाने तपासाची सूत्रे हाती घेतली.
तपासादरम्यान दि. १५ जुलै रोजी नावरा-नवरी गावाच्या शिवारातून गणेश पाटील ऊर्फ भोला याला ताब्यात घेण्यात आले. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या आरोपीने सखोल चौकशीनंतर गुन्ह्याची कबुली दिली. रिक्षाचालक मित्र संजय मनिलाल भांडारकर ऊर्फ बन्टी आण्णा याने दिलेल्या ऊसनवारीच्या पैशांवरून वाद झाल्याने अन्य तीन साथीदारांच्या मदतीने त्याचा गळा दाबून खून केल्याची कबुली आरोपीने दिली. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह धुळे-शिरपूर महामार्गावरील सावळदे तापी पुलावरून नदीत फेकल्याचेही त्याने सांगितले.
दरम्यान, पोलिसांनी धुळे व परिसरातील बेपत्ता व्यक्तींची माहिती तपासली असता पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात संजय भांडारकर बेपत्ता असल्याची मिसिंग नोंद (क्र. ५४/२०२६) असल्याचे समोर आले. तसेच त्यांची रिक्षा गोंदूर-मोराणे मार्गावरील निकम पॉलिटेक्निक महाविद्यालयाजवळ बेवारस अवस्थेत आढळून आली होती.
आरोपीच्या कबुलीनुसार दि. १५ जुलै रोजी तापी नदीत शोधमोहीम सुरू करण्यात आली. रात्री उशीर झाल्याने शोध थांबविण्यात आला. दुसऱ्या दिवशी सावळदे येथील कोळी बांधव आणि पोहणाऱ्यांच्या मदतीने पुन्हा शोध सुरू करण्यात आला. दुपारी नदीत तरंगणारा मृतदेह सापडला. मयताचा मुलगा गौरव ऊर्फ चेतन भांडारकर व नातेवाईकांनी मृतदेहाची ओळख संजय भांडारकर अशी पटविली. शवविच्छेदनानंतर खून झाल्याचे स्पष्ट झाले.
याप्रकरणी मयताचा मुलगा गौरव ऊर्फ चेतन भांडारकर यांच्या फिर्यादीवरून दि. १८ जुलै २०२६ रोजी धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३१५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१) अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शोधात सहभागी होऊन संशय दूर करण्याचा प्रयत्न
या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, संजय भांडारकर बेपत्ता झाल्यानंतर आरोपी गणेश पाटील हा त्यांच्या कुटुंबीयांसोबत शोधमोहीमेत सहभागी होत होता. “संजयचा शोध घेऊ” असा बनाव करून त्याने स्वतःवरील संशय दूर करण्याचा प्रयत्न केला. मात्र एलसीबीच्या बारकाईने केलेल्या तपासामुळे त्याचा हा डाव फसला.
एलसीबीची उल्लेखनीय कामगिरी
गोपनीय माहितीच्या आधारे सुरू झालेला तपास, आरोपीची कौशल्यपूर्ण चौकशी आणि अवघ्या काही दिवसांत खुनाचा उलगडा ही स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कामगिरी मानली जात आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक ढोके, पोलीस उपनिरीक्षक शाम निकम तसेच पवन गवळी, अमोल पाटील, सुनिल पाटील आणि त्यांच्या पथकाने केली.





