भोरटेकमध्ये मध्यरात्री चोरट्यांचा धुमाकूळ; सलग तीन घरांवर डल्ला, रोकड व चांदीचे दागिने लंपास
भडगाव ता.प्रतिनिधी : आमीन पिंजारी
कजगावजवळील भोरटेक (ता. भडगाव) येथील सी. टी. पाटील कॉलनीत अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री धाडसी चोरीची मालिका राबवत सलग तीन घरांचे कुलूप फोडून रोकड व चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांनी कायदा व सुव्यवस्थेबाबत तीव्र चिंता व्यक्त केली आहे.
माहितीनुसार, चोरट्यांनी प्रथम फारूक हाजी सलीम खाटीक यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील कपाटे व सामानाची उचकापाचक करत सुमारे ३० हजार रुपयांची रोकड चोरून नेली. त्यानंतर चोरट्यांनी भैय्या एकनाथ मिस्त्री (फौजी) यांच्या बंद घराचे कुलूप तोडून संपूर्ण घराची झडती घेतली. पुढे राकेश नटराज पाटील यांच्या घराचे सेफ्टी गेट कटरच्या साहाय्याने कापून घरात प्रवेश केला आणि तेथून चांदीचे दागिने लंपास केले. चोरीनंतर चोरटे अंधाराचा फायदा घेत पसार झाले.
रविवारी सकाळी चोरीचा प्रकार उघडकीस येताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. घटनेची माहिती मिळताच भडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल दत्तू पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. पोलिसांनी चोरट्यांचा माग काढण्यासाठी तपासाला वेग दिला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, संशयितांच्या हालचाली व इतर तांत्रिक पुरावे तपासले जात आहेत.
घटनास्थळी कजगावचे पोलीस पाटील राहुल पाटील, भोरटेकच्या पोलीस पाटील रेशमा पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. चोरीच्या या मालिकेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून रात्रीच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
कजगाव पोलीस चौकी सक्षम करण्याची मागणी
कजगाव परिसरात गेल्या काही महिन्यांत चोरीच्या घटना वारंवार घडत असल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना तीव्र झाली आहे. भडगाव तालुक्यातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या कजगाव पोलीस चौकीत कायमस्वरूपी किमान दोन पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, रात्रीची गस्त वाढवावी आणि संशयितांवर विशेष लक्ष ठेवावे, अशी जोरदार मागणी नागरिकांनी केली आहे.





