धुळे पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; अवघ्या ६ तासांत १.५५ कोटींच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी उघड, आरोपी मुद्देमालासह जेरबंद
धुळे जिल्हा प्रतिनिधी :- फहीम शाह
धुळे शहरातील आझादनगर पोलीस स्टेशनने अत्यंत तत्परता आणि कौशल्याचे दर्शन घडवत तब्बल १ कोटी ५५ लाख रुपये किमतीच्या १६१२ ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांच्या चोरीचा अवघ्या सहा तासांत छडा लावला. या प्रकरणी आरोपीला अटक करून चोरीस गेलेला जवळपास संपूर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याने धुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजरात राज्यातील जुनागड येथील अश्विनभाई दुर्लभजीभाई काचलिया (वय ६५) हे व्यवसायाने सराफ व्यापारी असून धुळे शहरातील ज्वेलर्सकडून ऑर्डर मिळविण्यासाठी आले होते. त्यांनी विक्रीसाठी आणलेले विविध प्रकारचे १६१२ ग्रॅम वजनाचे अंदाजे १ कोटी ५५ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने धुळे येथील द्वारकामाई लॉजमधील रूम क्रमांक २१९ मध्ये एका बॅगमध्ये ठेवून खोलीला कुलूप लावले होते.
त्यानंतर ते शहरातील विविध सराफ व्यावसायिकांकडे भेटी देण्यासाठी गेले. सायंकाळी परत आल्यानंतर रूमचा दरवाजा उघडा असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी खोलीची पाहणी केली असता सोन्याच्या दागिन्यांची बॅग गायब असल्याचे दिसून आले. यानंतर त्यांनी तातडीने आझादनगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
या तक्रारीवरून गुन्हा क्रमांक १३१/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम ३०५(अ) व ३३१(३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन आझादनगर पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी तात्काळ विशेष तपास पथक तयार करून आरोपीचा शोध सुरू केला.
तपासादरम्यान पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन आणि गोपनीय माहितीदारांच्या मदतीने संशयिताचा माग काढला. अवघ्या सहा तासांच्या अथक प्रयत्नांनंतर हितेश सुरेश सोनी (वय ४२, रा. गुलाबजी भवनजी कंपाऊंड, मालेगाव रोड, धुळे) याला ताब्यात घेण्यात आले.
पोलीस चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीस गेलेले मंगळसूत्र, अंगठ्या, लेडीज रिंग, कास्टिंग रिंग, कानातील बाली, डूल, पेंडंट, ब्रेसलेट, बारीक चेन, टॉप्स, काळ्या मण्यांचे मंगळसूत्र, व्हर्टिकल रिंग तसेच इतर विविध प्रकारचे सोन्याचे दागिने असा जवळपास संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला.
आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २० जुलै २०२६ पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे. या गुन्ह्यामागे आणखी कोणी सहभागी आहे का, तसेच आरोपीने यापूर्वी अशाच प्रकारचे गुन्हे केले आहेत का, याचा तपास पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत पोलीस निरीक्षक विनोद पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय ठाकूर तसेच गौतम सपकाळे, योगेश शिरसाठ, रफिक पठाण, शांतीलाल सोनवणे, संदीप कढरे, मनोज बागुल, विजय शिरसाठ, योगेश शिंदे, अनिल शिंपी, मकसूद खान पठाण, पंकज जोंधळे यांच्यासह आझादनगर पोलीस स्टेशनच्या पथकाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
धुळे पोलिसांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल अल्पावधीत हस्तगत झाला असून, या कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये धाक निर्माण झाला आहे. ही कारवाई धुळे पोलीस दलाच्या कार्यक्षमतेचे आणखी एक उत्कृष्ट उदाहरण मानली जात आहे.





